Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

क्राईम ब्रेकिंग: १५ गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला बारामती पोलिसांची ‘फिल्मी स्टाईल’ अटक; नदीत उडी मारून उसाच्या फडात लपला, पण…

0 6 9 4 5 5

बारामती: तब्बल १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचे नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) असूनही अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अखेर बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. चित्रपटातील थरारक दृश्यांनाही लाजवेल अशा पद्धतीने पळ काढणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी कऱ्हा नदी आणि उसाच्या फडातून दीड तासाच्या शोधमोहिमेनंतर शिताफीने जेरबंद केले.

​दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता बारामती शहर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरार आरोपी शंकर आडके हा एका दशक्रिया विधीसाठी आपल्या मूळ गावी आला आहे.

​माहिती मिळताच पोलिस हवालदार टापरे, पोलिस शिपाई गिरीश नेवसे व वैभव मदने यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.

  • नदीत उडी आणि उसाच्या फडात लपाछपी: पोलिसांची चाहूल लागताच स्वतःला वाचवण्यासाठी आरोपीने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीपात्रात उडी मारली. मात्र, जीवाची पर्वा न करता पोलिसांनीही त्याच्यामागे धाव घेतली. नदीतून पळत सुटलेला आरोपी काठावरील भिंत चढून जवळील दाट उसाच्या फडात शिरला.

  • दीड तासांचे ‘सर्च ऑपरेशन’: उंच वाढलेला ऊस आणि अरुंद पायवाटांमुळे मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, बारामती शहर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुमारे दीड तासाच्या कसून शोधमोहिमेनंतर उसात संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

आरोपी शंकर आडके याच्यावर बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरी (MSEB स्पेशल केस) आणि इतर गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. २०११ पासूनचे हे गुन्हे असून, न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्याने जाणीवपूर्वक पळ काढला होता. न्यायालयाचे समन्स, नोटिसा आणि नॉन बेलेबल वॉरंट बजावूनही तो सुनावणीला हजर राहत नव्हता.

या न्यायालयीन प्रक्रियेतील कागदपत्रांची पूर्तता, वॉरंटची अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात महिला पोलीस हवालदार सगुना आवटे व उमा कोकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

​सदर आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन:

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई वैभव मदने, महिला पोलीस हवालदार सगुना आवटे, पोलीस हवालदार उमा कोकरे व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत धाडस, चिकाटी, कायदेशीर कौशल्य आणि शिताफीने पार पाडली आहे. “गुन्हेगाराला कायद्यापासून दूर पळू दिले जाणार नाही, असा सज्जड दम बारामती पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे