बारामती : तालुका पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे मौजे सोनगाव येथील पारधी वस्तीवर मोठ्या पोलीस फौजफाट्यासह छापा टाकून अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.

ही धडक कारवाई आज सकाळी साडेपाच ते आठ वाजेच्या दरम्यान करण्यात आली.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजे सोनगाव पारधी वस्ती येथे अवैध हातभट्टी दारूची मोठी भट्टी लावली असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त छापा टाकला असता, त्या ठिकाणी एक मोठी लोखंडी भट्टी, अंदाजे ८०० लिटर कच्चे रसायन (वॉश) आणि दारू गाळण्याचे साहित्य मिळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी जप्त केलेले रसायन जागीच नष्ट केले आणि दारूची भट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५ (फ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान एका पाहिजे असलेल्या (वॉन्टेड) आरोपीला पकडण्यात यश आले असून त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्याकडील अधिकारी व अंमलदार, तसेच राज्य उत्पादन शुल्क बारामती विभागाचे उपाधीक्षक गणेश कसरे, निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. अवैध धंद्यांवर कारवाई यापुढेही सुरु राहील, असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्पष्ट केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा