
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा कणा असलेल्या ‘श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या’ची २०२६-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक सध्या संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. सहकार महर्षींनी आणि सामान्य शेतकऱ्यांनी घामातून उभा केलेला हा कारखाना आज नेत्यांच्या वैयक्तिक ‘अहंकार’, ‘मी’पणा आणि सत्तेच्या साठमारीचा आखाडा बनला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या सभासद शेतकऱ्यांच्या जिवावर हा कारखाना उभा आहे, त्यांच्या हिताचे, कारखान्याच्या आर्थिक विकासाचे किंवा भविष्यातील नियोजनाचे सर्वच मुद्दे या निवडणुकीतून पूर्णपणे गायब झाले आहेत.
ही निवडणूक केवळ ‘कारखान्यावर निर्विवाद सत्ता कोणाची?’ या एकाच मग्रूर हेतूने लढवली जात असल्याचे अत्यंत विदारक चित्र आज समोर आले आहे.

सध्याच्या राजकीय रणधुमाळीत तीन प्रमुख पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, ज्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे,
१. श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल: हे पॅनेल थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना यांच्याकडून पुरस्कृत आहे. या पॅनेलचे निवडणूक चिन्ह ‘कपबशी’ आहे.
२. लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल: हे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांचे बंडखोर पॅनेल आहे. या पॅनेलचे निवडणूक चिन्ह ‘शिट्टी’ आहे.
३. श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल: हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनेल असून, या विरोधी गटाचे चिन्ह ‘किटली’ आहे.

या निवडणुकीतील सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का म्हणजे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी पुकारलेली बंडखोरी. आतापर्यंत अजित पवार गटाचे अत्यंत निष्ठावान शिलेदार आणि कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिलेल्या जगताप यांनी अचानक फारकत का घेतली?, याचे मूळ कारण कोणत्याही धोरणात्मक मतभेदात नाही, तर त्यांच्या ‘मी’पणात आणि वैयक्तिक अहंकारात दडले आहे.
“मी सांगतो त्या लोकांना उमेदवारी द्या आणि जे लोक मला नको आहेत त्यांना डावला,” हा त्यांचा अट्टाहास सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाला सर्वस्वी कारणीभूत ठरला आहे. केवळ स्वतःच्या मर्जीतील लोकांची वर्णी लावण्यासाठी आणि आपलाच शब्द अंतिम राहावा यासाठी त्यांनी थेट अजित पवार गट आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री व तालुक्याच्या नेत्या श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनाच उघड आव्हान देण्याचे धाडस केले आहे.
विद्यमान चेअरमन म्हणून त्यांनी स्वतःच्या मागील पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा, कारखान्याचा ताळेबंद आणि पुढील विकासाची दिशा जनतेसमोर ठेवायला हवी होती. मात्र, तिकीट वाटपाच्या रागातून आणि अहंकारापोटी त्यांनी मूळ प्रश्नांना बगल दिली आहे. त्यांचा हा हेका अनेक जाणकार सभासदांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण करत आहे.
एखाद्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही नेहमी उसाला मिळणारा भाव, कारखान्याचे आधुनिकीकरण, इथेनॉल किंवा सहवीज निर्मितीचे प्रकल्प आणि शेतकरी कल्याण या मुद्द्यांवर लढवली जाणे अपेक्षित असते. पण सोमेश्वरच्या या निवडणुकीत एकाही व्यासपीठावरून यावर अवाक्षरही काढले जात नाही. फक्त आम्ही असताना हे केले आणि ते केले,आणि मी हे केले यावरच एकूण हा प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रचार सभा, गावोगावच्या बैठका आणि नेत्यांच्या भाषणांमधून ‘आम्ही निवडून आलो तर पुढील पाच वर्षांत काय बदल करू?’ हे सांगायला कोणीही तयार नाही.
सर्वांत गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे या तीनही पॅनेलमध्ये छुपे ‘साटेलोटे’ एकमेकांचे वैयक्तिक व राजकीय संबंध आणि अंतर्गत नातेगोते उघडपणे पाहायला मिळत आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट हे परस्परांच्या धोरणांवर किंवा चुकांवर बोलण्याऐवजी सोयीस्कर मौन बाळगून आहेत. या दोन्ही गटांनी आपला सर्व रोख केवळ तिसऱ्या म्हणजेच पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला ‘टार्गेट’ करण्यावर केंद्रित केला आहे.
सत्ताधारी म्हणून कारखान्याच्या प्रशासनावर, विद्यमान संचालक मंडळाच्या चुकांवर आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवायला कोणीही तयार नाही, कारण कुठेतरी सगळेच जण या सत्तेचे वाटेकरी राहिले आहेत.
श्रीमती सुनेत्रा पवार व अजित पवार गट: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि तालुक्याचे नेतृत्व म्हणून सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर या निवडणुकीची अत्यंत मोठी जबाबदारी आहे. पण केवळ आपली राजकीय सत्ता टिकवणे हाच उद्देश न ठेवता, सोमेश्वर कारखान्याला राज्याच्या सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्याचे कोणते धोरण त्यांच्याकडे आहे, हे त्यांनी सभासदांना ठामपणे सांगायला हवे होते. त्यात ते कमी पडताना दिसत आहेत.
शरद पवार गट: एक प्रबळ आणि अनुभवी राजकीय विरोधक म्हणून या गटाने कारखान्यातील सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढत एक भक्कम, पारदर्शक आणि शेतकरी हिताचा पर्यायी विकासाचा आराखडा मांडणे अपेक्षित होते. मात्र, तेही केवळ राजकीय गणिते जुळवण्यात आणि मूकसंमतीच्या सोयीस्कर राजकारणात धन्यता मानत आहेत.
आज सोमेश्वर कारखान्यावर अवलंबून असलेल्या आणि रात्रंदिवस राबणाऱ्या हजारो सभासद शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक साधीसुधी नसून तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य ठरवणारी आहे. जर तुम्ही या निवडणुकीला गांभीर्याने न घेता, नेत्यांच्या अहंकाराला बळी पडून केवळ नातेवाईक, जात, पक्ष आणि ओळखीच्या आधारावर मतदान केले, तर पुढील पाच वर्षे कारखान्याची आणि पर्यायाने तुमची फरफट अटळ आहे.
आता वेळ आली आहे की सभासदांनी नेत्यांना थेट जाब विचारला पाहिजे—”तुमचे पुढील पाच वर्षांचे नियोजन काय आहे? संचालक मंडळात तुम्ही कोणाला बसवणार आहात आणि त्यांची सहकार क्षेत्रातील योग्यता काय आहे?”
जोपर्यंत सभासद स्वतःहून या साटेलोट्याच्या आणि अहंकाराच्या राजकारणाला नाकारून ‘मुद्द्यांवर’ आधारित मतदान करणार नाहीत, तोपर्यंत सोमेश्वर कारखान्यात खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे रक्षण करणारे आणि पारदर्शक कारभार करणारे संचालक मंडळ कधीही अस्तित्वात येणार नाही. आता निर्णायक मत सभासदांच्या हातात आहे,
डोळे झाकून सत्तेच्या आणि राजकारणाच्या मागे जायचे, की उघड्या डोळ्यांनी सोमेश्वर कारखान्याचे आणि आपल्या घामाचे हित पाहणाऱ्या योग्य उमेदवारांना निवडून द्यायचे!
“बदल आता तुमच्याच हातात आहे.”
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा