महाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई: फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या तीन बुलेटस्वारांवर १८ हजारांचा दंड

0
9
5
9
8
2
वडगाव निंबाळकर: बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर बसवून रस्त्यावरून जाताना फटाक्यांसारखा मोठा आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करत तब्बल १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढले होते. या सायलेन्सरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असून, रस्त्यावरून चालणारे पादचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन बुलेट मोटारसायकली पकडून त्यांच्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली. या तिन्ही चालकांकडून एकूण १८ हजार रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यांच्या गाड्यांना बसवलेले मॉडिफाइड सायलेन्सरही पोलिसांनी काढून घेतले आहेत.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मोहिते आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार खेडकर, खांडेकर, पोलीस अंमलदार महेश पन्हाळे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल यादव, आबा जाधव, सुरज धोत्रे, विकास येटाळे आणि पवार यांनी सहभाग घेतला.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवू नयेत. ध्वनीप्रदूषण करून नागरिकांना त्रास होईल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई सुरूच राहील, असा कडक इशारा वडगाव निंबाळकर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.



