Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माळेगाव बुद्रुकमध्ये पेट्रोल पंपावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; लोखंडी कोयत्याने सपासप वार, तिघे गंभीर जखमी

0 9 2 8 6 3

बारामती : भांडण सोडविल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने हातात लोखंडी कोयते घेऊन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील तावरे पेट्रोल पंपावर घडली आहे. सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून, माळेगाव पोलीस ठाण्यात १२ ते १३ जणांवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप दत्तात्रय जगताप (वय ४६, रा. अमरसिंह कॉलनी, माळेगाव बुद्रुक), अनिकेत उदयसिंह धुमाळ (वय २७) आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर (वय २९) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप जगताप यांनी बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या फिर्यादीवरून गणेश भोसले, शुभम मोरे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे (सर्व रा. बारामती), मयूर रामचंद्र शितोळे (रा. माळेगाव बुद्रुक) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर ६ ते ७ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप जगताप हे त्यांचे मित्र अनिकेत धुमाळ, पृथ्वीराज निंबाळकर आणि तरंग लोणकर यांच्यासोबत माळेगाव बुद्रुक हद्दीतील तावरे पेट्रोल पंपावर गप्पा मारत थांबले होते.

यातील अनिकेत धुमाळ याने काही दिवसांपूर्वी एक भांडण मध्यस्थी करून सोडविले होते. याचाच राग मनात धरून आरोपी गणेश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी थेट पेट्रोल पंपावर येऊन हल्ला चढवला.
‘तुम्हाला लय माज आलाय, तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपींनी हातातील धारदार लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात संदीप जगताप, अनिकेत धुमाळ आणि पृथ्वीराज निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्या ठिकाणी लोकांची गर्दी जमा होऊ लागल्याने, ‘तुमच्याकडे बघून घेतो’ अशी धमकी देऊन आरोपींनी आपल्या मोटारसायकलींवरून तेथून पोबारा केला.

या गंभीर घटनेची नोंद माळेगाव पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २६१/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ आणि २५ नुसार करण्यात आली आहे. या गुन्ह्याची नोंद दाखल अंमलदार पोलीस हवालदार पटारे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे हे करीत आहेत. या घटनेमुळे माळेगाव आणि बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे