अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
वडगाव निंबाळकरमध्ये अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ३००० बांबूची लागवड; सायकल स्पर्धेचे स्वागत आणि शाळकरी मुलांची भावस्पर्शी भाषणे

0
7
9
1
4
9
वडगाव निंबाळकर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. रिमझिम पावसाच्या वातावरणात ग्रामपंचायत कार्यालयात अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याचवेळी ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील सर्व शाळांना त्यांच्या प्रतिमेचे वाटपही करण्यात आले.

यानिमित्त ग्रामपंचायतीने एक दूरदृष्टीचा निर्णय घेत गावात तब्बल ३००० बांबूच्या झाडांची लागवड केली. ग्रामपंचायत परिसर, गावातील ओढ्याच्या बाजूला आणि स्मशानभूमी परिसरातील नवीन दहाव्याच्या ठिकाणी ही लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि ग्रामपंचायतीच्या भविष्यातील शाश्वत उत्पन्नाचा विचार करून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

बांबू इतर झाडांच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो, ज्यामुळे हवा शुद्ध राहून जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. तसेच, अवघ्या तीन ते चार वर्षांत बांबू उत्पादनासाठी तयार होतो. हस्तकला, फर्निचर, कागद आणि बांधकाम क्षेत्रात बांबूला असलेली मोठी मागणी पाहता, भविष्यात ग्रामपंचायतीला यातून शाश्वत आणि नियमित आर्थिक उत्पन्न मिळेल. या उत्पन्नातून गावातील विकासकामे आणि मूलभूत सुविधा सक्षम करणे शक्य होणार आहे. निसर्गाशी सांगड घालत गावाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणारा ग्रामपंचायतीचा हा निर्णय इतर गावांसाठी नक्कीच एक उत्तम आदर्श आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळा नंबर एक (मुलांची) या ठिकाणीही दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अजितदादांप्रती असलेली आपली भावना व्यक्त करत अतिशय प्रभावी आणि भावस्पर्शी अशी भाषणे केली. या शाळेतील सर्वच मुलांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थित भारावून गेले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशासक तथा सरपंच सुनील ढोले, संजय साळवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल शिंदे, उपाध्यक्ष अशोक साळवे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
तसेच, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने दिवंगत अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वापार चालत आलेली पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आता त्यांच्या जयंतीनिमित्त औपचारिक पद्धतीने घेण्यात आली. ही एक अखंड परंपरा म्हणून पुढेही सुरू राहील. या सायकल स्पर्धेतील स्पर्धकांना शुभेच्छा व प्रेरणा देण्यासाठी निरा-बारामती रोडवर आठ फाटा आणि वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्यामंदिर व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. त्यांनी उत्साहात सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या.




