बारामती : ६ ऑक्टोबर २०२६
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीने आता अत्यंत नाट्यमय वळण घेतले आहे. श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाईची मोठी घोषणा केली.

बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाचे पडद्यामागचे सत्य आणि पक्षाची भूमिका जय पवार यांनी सविस्तरपणे व आक्रमकपणे मांडली.
काही दिवसांपूर्वी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांना अजितदादांचे नाव आणि छायाचित्रे परवानगीशिवाय न वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. असे असूनही काल त्यांनी सुनेत्रा वहिनींचा व्हिडिओ आणि अजितदादांचा आवाज असलेला व्हिडिओ प्रचारासाठी परस्पर वापरला. या मनमानी कारभारामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार असून, आज सायंकाळपर्यंत कारवाईचे स्वरूप जाहीर केले जाईल, असे जय पवार यांनी ठणकावून सांगितले. तसेच ही संपूर्ण परिस्थिती एकाच व्यक्तीमुळे निर्माण झाली असल्याने केवळ जगताप यांच्यावरच कारवाई होईल, त्यांच्या पाठीशी असलेल्या इतर कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जय पवार यांनी पॅनेल निर्मितीचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला. ते म्हणाले की, २८ तारखेला जगताप १६ नावांची यादी घेऊन आले होते, ज्यावर सुनेत्रा वहिनींसोबत चर्चा झाली. त्यानंतर २९ तारखेला मध्यरात्री दोन वाजता पुन्हा बैठक होऊन अंतिम पॅनेल ठरले. मात्र, सध्या जगतापांचे दौरे आणि प्रचाराची पद्धत पाहता, त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळा प्लॅन होता, असा संशय जय पवार यांनी व्यक्त केला. या पॅनेलमध्ये उमेश पाटील यांची कोणतीही भूमिका नसून हे पॅनेल सुनेत्रा वहिनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून तयार केल्याचे त्यांनी नमूद केले.
कारखान्याच्या निवडणुकीत आपला कोणताही राजकीय स्वार्थ नसून अजितदादांच्या पारदर्शक कार्यपद्धतीने हा कारखाना चालवणार असल्याची ग्वाही जय पवार यांनी दिली. जर काही चूक झाली, तर सुनेत्रा वहिनी आणि आम्ही त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारू, पण आम्ही कोणतीही चूक होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या निवडणुकीत भाजपचा सहभाग असल्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत, ही कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या प्रचारात अजितदादांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड प्रेम असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक गर्दी या कारखान्याच्या प्रचारात होत आहे. विशेष म्हणजे, लोकसभेला ज्यांनी शरद पवारांना साथ दिली होती, तेच लोक आता या निवडणुकीत आमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत, असा मोठा दावाही जय पवार यांनी केला.
या पत्रकार परिषदेमुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत आता थेट पक्ष विरुद्ध बंडखोर असा सामना रंगण्याची चिन्हे असून बारामती परिसरातील राजकीय समीकरणे आणखी ढवळून निघणार आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा