पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला बारामती येथील न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
विलास दादा नेटके (रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये आप्पा सुदाम सकट यांनी फिर्याद दिली होती.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, १५ जुलै २०२० रोजी आरोपी विलास नेटके याने आपली पत्नी ललीता नेटके हिच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच रागातून त्याने पत्नीला हातातील लोखंडी हातोड्याने डोक्याच्या उजव्या बाजूस मारून जबर दुखापत केली. तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन अधिकारी एन. एस. लकडे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांच्यासमोर ४ ऑगस्ट २०२६ रोजी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जखमी पत्नी ललीता आणि मुलगा सुमेश यांच्यासह तपासी अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. तसेच डॉ. शलाका लोणकर यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली.
विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी केलेला युक्तिवाद आणि वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपी विलास नेटके याला भा.दं.वि. कलम ३०७ अन्वये ७ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भा.दं.वि. कलम ३२३ अन्वये ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी किशोर वाघ यांनी केस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांना पोलीस हवालदार वेणूनाथ ढोपरे, तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक गोरख कसपटे व सहाय्यक फौजदार ए. जे. कवडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा