Breaking
अपघातदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

“महाराष्ट्राचा ढाण्या वाघ हरपला…  भावपूर्ण श्रद्धांजली” महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला; बारामतीच्या मातीतच अजित पर्वाचे वादळ शमले 

0 5 9 3 8 7

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा आणि अफाट कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. नियतीचा हा क्रूर घाला इतका अचानक होता की, अवघ्या महाराष्ट्राला या बातमीने सुन्न करून सोडले आहे. ज्या बारामतीच्या मातीवर त्यांनी जीवापाड प्रेम केले, त्याच बारामतीच्या भूमीत उतरताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

आज (बुधवार, २८ जानेवारी) सकाळी मुंबईवरून बारामतीकडे झेप घेतलेले खाजगी विमान (Learjet 45) बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अपघातग्रस्त झाले. सकाळी ८:४५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजित सभांसाठी दादा आपल्या होमपीचवर येत होते. मात्र, विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे भरकटले आणि काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांसह वैमानिक आणि इतर सहकारी अशा एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोरकी झाली बारामती, हळहळला महाराष्ट्र

अजित पवार म्हणजे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते प्रशासनावरील जबरदस्त पकड आणि ‘शब्दाला पक्का’ असलेला नेता म्हणून ओळखले जात होते. पहाटेपासून कामाचा धडाका लावणारा हा नेता आज असा अचानक शांत होईल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बारामतीसह संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि अगदी विरोधकही या घटनेने हादरून गेले आहेत.

राजकीय क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी

“राज्याचा एक बुलंद आवाज हरपला,” अशा भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत, “मी माझा जिवाभावाचा मित्र आणि महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजितदादांच्या जनसंपर्काचे आणि तळागाळातील कामाचे कौतुक करत श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्य सरकारने या घटनेनंतर ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. पवार कुटुंबाच्या एकत्रित संमतीने अजितदादांच्या पार्थिवावर बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

आज बारामतीचा सह्याद्री कोसळला आहे. ज्यांच्या करारी आवाजाने आणि प्रशासकीय धाकाने मंत्रालयाचे दरवाजे हल्लोळत असत, तो आवाज आज कायमचा शांत झाला आहे. अजितदादांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांच्या लाखो चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

भावपूर्ण श्रद्धांजली!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे