बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार असे या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सविस्तर माहितीनुसार, ३० जुलै २०२० रोजी दौंड तालुक्यातील मळवडी, खुटबाव येथे ही घटना घडली होती. अनैतिक संबंधांच्या संशयावरून आरोपी प्रमोद पवार याने मनिषा जाधव आणि गुलचंद विक्रम या दोघांची लाकडी दांडके आणि लोखंडी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पोपट बाबुराव कांबळे यांनी ३१ जुलै २०२० रोजी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आरोपीने तपासी अधिकाऱ्यांना स्वतःचे खोटे नाव सांगून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला होता.
या खटल्याची सुनावणी बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश १ व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर बसेकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. यामध्ये घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बाळाबाई देविदास जाधव यांची साक्ष खटल्याकामी अत्यंत महत्त्वाची ठरली. तसेच तपासी अधिकारी बी. एन. पाटील यांची साक्षही नोंदवण्यात आली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. भा.दं.वी. कलम ३०२ अंतर्गत आरोपीला जन्मठेप (सक्तमजुरी) आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय कलम १७६ आणि १७७ अन्वये प्रत्येकी सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. २ जुलै २०२६ रोजी हा निकाल देण्यात आला.
या प्रकरणाचा तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सागर माने यांनी केला. त्यांना पोलीस नाईक वेणुनाथ ढोपरे यांनी सहकार्य केले, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून गोरख कसपटे आणि सहाय्यक फौजदार ए. जी. कवडे यांनी काम पाहिले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा