ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘सत्तर हजारां’च्या ठिणगीने उघड झाले ‘सव्वाचार कोटीं’चे घबाड! गोंदियात ट्रॅप, पुण्यात छापा आणि बारामती कनेक्शन… लाचखोर RTO अधिकाऱ्याच्या ‘कलेक्शन’ साम्राज्याला सुरुंग!

0
3
9
4
5
7
बारामती: एका बाजूला शासनाचा पगार आणि दुसऱ्या बाजूला टेबलाखालून चालणारी लाखोंची उलाढाल… भ्रष्टाचाराची ही वाळवी प्रशासनाला कशी पोखरते आहे, याचे जिवंत उदाहरण गोंदियाच्या घटनेने समोर आणले आहे. जेसीबी पासिंगसाठी अवघ्या ७० हजारांची लाच घेणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) राजेंद्र केसकर यांच्या अंगलट आले असून, या एका कारवाईने त्यांच्या ४ कोटी २५ लाखांच्या बेहिशोबी साम्राज्याचा पर्दाफाश केला आहे.
गोंदिया येथे कार्यरत असलेल्या राजेंद्र केसकर यांनी परराज्यातील जेसीबी पासिंगसाठी ७० हजार रुपयांची लाच मागितली. यासाठी त्यांनी राजेश माहेश्वरी (५७) या एजंटला मध्यस्थ म्हणून वापरले. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या सापळ्यात दि. ४ डिसेंबर रोजी हे दोघेही रंगेहाथ पकडले गेले. लाचखोरीची ही साखळी इथेच थांबली नाही, तर तिची पाळेमुळे थेट पुण्यापर्यंत आणि बारामतीपर्यंत पोहोचली आहेत.
पुण्यातील बंगल्यात दडलंय काय?
केसकर यांना अटक होताच एसीबीने त्यांच्या पुण्यातील निवासस्थानावर धाडसत्र राबवले. यावेळी तपास पथकाला जे आढळले, ते पाहून अनेकांचे डोळे विस्फारले:
* रोख रक्कम: ६ लाख ६६ हजार रुपये.
* स्थावर मालमत्ता: आलिशान घरे, फ्लॅट्स आणि मोक्याच्या ठिकाणी प्लॉटची कागदपत्रे.
* दागिने: मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने.
* एकूण जप्ती: तब्बल ४ कोटी २५ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता!
एका शासकीय अधिकाऱ्याकडे पगाराव्यतिरिक्त एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? हा प्रश्न आता उपस्थित झाला असून एसीबीने या प्रकरणी स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करत तपास सुरू केला आहे.
चर्चेतील ‘बारामती पॅटर्न’ आणि एजंटगिरी
राजेंद्र केसकर यांचे ‘बारामती कनेक्शन’ आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे. गोंदियाला जाण्यापूर्वी ते बारामती RTO कार्यालयात कार्यरत होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत असताना केसकर यांनी वसुलीसाठी एक ‘खासगी यंत्रणा’ राबवली होती. कार्यालयात स्वतः थेट पैसे न घेता, एका विशिष्ट एजंटमार्फत ‘कलेक्शन’ गोळा करून ते साहेबांपर्यंत पोहोचवले जात होते. गोंदियात जो ‘माहेश्वरी’ सापडला, तसाच एखादा ‘चेहरा’ बारामतीतही कार्यरत होता का? याचा आता एसीबीकडून शोध घेतला जात आहे.
केसकर यांच्या संपूर्ण सेवाकाळातील (Service Record) आर्थिक व्यवहारांची कुंडली मांडण्याचे काम सुरू आहे. त्यांनी यापूर्वी जिथे-जिथे काम केले, तिथेही अशाच प्रकारे संपत्ती जमवली आहे का? आणि बारामतीतील त्यांचे जुने सहकारी किंवा एजंट चौकशीच्या फेऱ्यात येणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






