गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
सुपा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! १ लाख २५ हजारांचे गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत.

0
3
9
4
5
7
सुपा बारामती : सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे मोबाईल शोधून काढण्यात सुपा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे एकूण ०७ मोबाईल हँडसेट हस्तगत केले असून, ते मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले आहेत. सुपा पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणांवरून मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. सध्याच्या काळात मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे साधन असल्याने, नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे (DB Squad) पोलीस अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंके यांना गहाळ मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले.
गुन्हे शोध पथकाने तात्काळ गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या (Technical Investigation) तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे मोबाईल नेमके कुठे सुरू आहेत याचा माग काढण्यात आला. विशेष म्हणजे, पोलिसांनी हे ०७ मोबाईल हँडसेट केवळ स्थानिक भागातूनच नव्हे, तर काही मोबाईल परराज्यातूनही हस्तगत केले आहेत. या कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण ७ मोबाईल रिकव्हर करण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत १,२५,०००/- रुपये इतकी आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. आपले हरवलेले आणि मिळण्याची आशा सोडून दिलेले मोबाईल पुन्हा हातात मिळताच नागरिकांनी सुपा पोलिसांचे मनापासून आभार मानले.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) मा. श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती उपविभाग) मा. श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी आणि गुन्हे शोध पथकाचे अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंके यांनी केली आहे.






