Breaking
अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

माळेगाव येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा थाटात शुभारंभ; बारामती आरटीओ हद्दीत अपघातांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम

0 6 4 8 8 7

बारामती/माळेगाव: रस्त्यावरील सुरक्षितता हा केवळ नियम नसून ती काळाची गरज बनली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), बारामती आणि शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (SVPM), माळेगाव बु‌द्रूक यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी बारामती कार्यालयाच्या हद्दीत मागील वर्षीच्या तुलनेत एकूण अपघातांमध्ये १५ टक्के तर मृत्यूच्या प्रमाणात ८ टक्क्यांनी घट झाल्याची दिलासादायक माहिती दिली.

माळेगाव येथील शरद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि ‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शक’ पुस्तिकेच्या विमोचनाने झाली. तत्पूर्वी सकाळी १० वाजता शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॅम्पसपासून माळेगाव नगरपंचायत वेसपर्यंत भव्य ‘बाईक रॅली’ काढण्यात आली.

या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता, ज्यामुळे रस्ता सुरक्षेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.

विद्यार्थ्यांचे पथनाट्य आणि जनजागृती

कार्यक्रमात शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मदत करणे, हे मुद्दे विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले.

तज्ञांचे मार्गदर्शन आणि ‘चांडाळ चौकडी’ची हजेरी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव धनंजय डोंबरे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी वाहतूक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध ‘चांडाळ चौकडी’ वेबसिरीजमधील कलाकार रामभाऊ जगताप आणि भरत शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सुरेंद्र निकम यांनी ‘डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग’ आणि ‘गुड अमेरीटन’ (अपघातग्रस्ताला मदत करणारी व्यक्ती) कायद्याची माहिती दिली. तसेच पोस्ट विभागाच्या अवघ्या ५५० रुपयांच्या वार्षिक हप्त्यात १० लाखांचे विमा कवच मिळत असल्याची माहिती देऊन नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सेवानिवृत्त मोटर वाहन निरीक्षक अनिल पंतोजी यांनी पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे, लहान मुले सोबत असताना वाहनाचा वेग ४० किमी पेक्षा कमी ठेवणे आणि बस-ट्रकच्या ‘ब्लाईंड स्पॉट’ बद्दल तांत्रिक माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य संदीप शहा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरटीओ कार्यालयातील निरंजन पुनसे, पद्माकर भालेकर, बजरंग चांगुले, नितीन घोडके, राजकुमार नरखेडे, सुरज पाटील, मोहन भापकर, संजय भापकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे