
बारामती : सध्याच्या काळात वाढदिवस म्हणजे झगमगाट, डीजे आणि पार्ट्यांचे समीकरण बनले आहे. मात्र, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवत महाराष्ट्र पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मुलीचा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि कौतुकास्पद पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
वडगाव (ता. बारामती) येथील रहिवासी असलेले नवनाथ खोडके यांनी आपली सात वर्षांची कन्या कु. रेणुका नवनाथ खोडके हिचा वाढदिवस बारामती तालुक्यातील मोढवे येथील ‘यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेत’ साजरा केला. पोलीस दलात कार्यरत असतानाही सामाजिक भान जपत त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

मोढवे येथील या आश्रमशाळेत अनेक गोरगरीब आणि गरजू मुले-मुली शिक्षण घेत आहेत. वाढदिवसानिमित्त या सर्व विद्यार्थ्यांना खोडके परिवाराकडून मिष्टान्न भोजन देण्यात आले. जेवणाच्या पंगतीसोबतच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. घरातील सदस्यांप्रमाणेच आश्रमशाळेतील मुलांनीही या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. आपल्यात येऊन कोणीतरी आपला वाढदिवस साजरा करत आहे, हे पाहून या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.
सामाजिक जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला नवनाथ खोडके यांच्यासह स्वाती खोडके, गणेश खोडके, धीरण पवार, जीवन राऊत, सतीश खुंटाळे, बापू जाधव, गणेश शेलार, तसेच श्वेता खोडके व स्नेहल महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत खोडके परिवाराच्या या निर्णयाला दाद दिली.
केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर अंतःकरणातून केलेल्या या मदतीमुळे परिसरात खोडके परिवाराचे अभिनंदन होत आहे.
“आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, ही भावना प्रत्येकाने जपायला हवी. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तो पैसा जर गरजूंच्या शिक्षणासाठी किंवा आनंदासाठी खर्च केला, तर त्याचे समाधान अधिक मिळते,” अशी भावना यावेळी नवनाथ खोडके यांनी व्यक्त केली.
समाजाभिमुख पद्धतीने साजरा केलेला हा वाढदिवस केवळ एक कौटुंबिक सोहळा न ठरता, इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा