गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
सोन्याच्या हव्यासापोटी अमानुष थरार! झोपेत असतानाच दोन वृद्ध महिलांवर कुऱ्हाडीचे घाव; पुणे ग्रामीण पोलिसांकडून हत्येचा उलगडा, नात्यातील तरुण गजाआड

0
9
4
0
7
2
सुपा (बारामती) : हद्दीतील शेरेची वाडी येथे चोरीच्या उद्देशाने दोन वृद्ध महिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकास ऊर्फ आप्पा राजेंद्र लडकत (वय २५ वर्षे, रा. शेरेची वाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मृत महिलांच्या भावकीतीलच आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २९ सप्टेंबर २०२६ रोजी शेरेची वाडी येथे ही भयंकर घटना घडली होती. फिर्यादी गणेश मारुती लडकत यांच्या आई इंदुमती मारुती लडकत (वय ७५ वर्षे) आणि चुलत वहिणी कृष्णाबाई पुंडलिक लडकत (वय ५५ वर्षे) या दोघी घरात झोपलेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने घरात जबरदस्तीने घुसून सामानाची उचकापाचक केली आणि दोघींच्या अंगावरील ६ लाख रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर गंभीर वार करून खून केला. याप्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३०९(४), ३३२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलीस स्टेशनची मिळून एकूण ८ पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर व कर्नाटकमधील २०० हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली. स्थानिक पातळीवर तपास करत असताना शेरेची वाडी गावातील विकास लडकत या तरुणाच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या.
पोलिसांनी विकासला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो प्रथम दर्शनी गोंधळलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने केवळ सोन्याचे दागिने चोरण्यासाठी भावकीतील दोन्ही महिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.




