बारामती : शहरात एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगार जयेश बाळासाहेब माने याला शिताफीने अटक केली आहे. जयेश माने याच्यावर यापूर्वीही खुनाचा आणि हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल असून, आता पुन्हा एकदा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामदार रोडवरील ग्रीन सिटी परिसरात ही घटना घडली. फिर्यादी सुमित संतोष सोनवणे (वय २१) याला आरोपी जयेश माने, सोमा यादव आणि प्रतीक यांनी अडवून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवले. सुमित इतर मित्रांसोबत फिरत असल्याच्या कारणावरून वाद घालत जयेश माने याने त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वरसारखे शस्त्र लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हातात कोयते हवेत उंचावून परिसरात दहशत निर्माण केली. जयेशने सुमितच्या मान आणि छातीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीव वाचवताना सुमितच्या उजव्या पायाला कोयता लागून गंभीर दुखापत झाली, ज्यावर रुग्णालयात उपचारादरम्यान सात टाके घालण्यात आले आहेत.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ३ नोव्हेंबर रोजी पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना आरोपी जयेश माने हा खंडोबानगर परिसरातील एका चहाच्या दुकानाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विजय हरी टेळकीकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयेशचा पोलीस शिपाई सागर जामदार यांनी थरारक पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
जयेश माने याचे पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर २०२४ मध्ये जळोची येथे एका सतरा वर्षीय मुलाचा खून केल्याचा आणि २०२५ मध्ये हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या सततच्या गंभीर गुन्ह्यांमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि सहआरोपींचा कसून तपास करण्यात येणार आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय हरी टेळकीकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा