माळेगाव: माहेरी यात्रेसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेवर कोल्ड्रिंक देण्याच्या बहाण्याने अत्याचार करून, घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अभिषेक मुकुंदराव जगताप (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने स्वतः माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आणि त्यापूर्वीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडित महिला आपल्या माहेरी यात्रेसाठी गेली होती. त्यावेळी तिच्या भावकीतील असलेला आरोपी अभिषेक जगताप याने तिला कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच, घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास त्याने काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली.
या धमकीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेच्या सासरी जाऊनही वेळोवेळी आणि वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. या सततच्या ब्लॅकमेलिंगला आणि जाचाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
पीडितेच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलिसांनी आरोपी अभिषेक जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (२) (m), ३५१ (१) आणि (२) अन्वये गुन्हा नोंद क्रमांक १९६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) अनिल ओमासे हे करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा