Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सोमेश्वर सहकारी कारखाना निवडणुक! वर्षानुवर्षे तेच तेच अध्यक्ष, तेच उपाध्यक्ष आणि तेच संचालक पाहून कंटाळले सभासद. ‘प्रस्थापित टोळी’ला उखडून फेकण्यासाठी सभासद एकवटले;  २१ जागांसाठी तब्बल ५१४ उमेदवार रिंगणात

सोमेश्वर कारखान्यावर आता एकाधिकारशाही चालणार नाही! 'प्रस्थापित टोळी'ला उखडून फेकण्यासाठी सभासद तयार.

0 9 2 3 2 4

सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आता अत्यंत रंगतदार आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. आजपर्यंत तालुक्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या शब्दावर आणि मार्गदर्शनाखाली चालणारी कारखान्याची एकाधिकारशाही आता पूर्णपणे मोडीत निघताना दिसत आहे. वर्षानुवर्षे तेच तेच अध्यक्ष, तेच उपाध्यक्ष आणि तेच संचालक पाहून कंटाळलेले सभासद आता या प्रस्थापित व्यवस्थेला आणि कारखान्यावरील ‘टोळीला’ अक्षरशः वैतागले आहेत. बदल हा अटळ आहे आणि तो यावेळेस कोणत्याही परिस्थितीत करायचाच, असा पक्का चंग आता सभासदांनी बांधला आहे.

कारखान्याला कितीही मोठे पुरस्कार मिळाले तरी, आता आम्हाला ही प्रस्थापितांची टोळी नकोच आहे, अशी स्पष्ट आणि रोखठोक मानसिकता सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील सभासदांची झाली आहे. आजवर कारखान्यावर एका विशिष्ट गटाचे निर्विवाद वर्चस्व होते. दिवंगत अजितदादा सांगतील तसेच घडणार आणि ते म्हणतील तीच पूर्व दिशा, अशी इथली हुकूमशाही प्रवृत्तीची कार्यपद्धती होती. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. प्रस्थापितांची ही एकाधिकारशाही आणि सभासदांना गृहीत धरण्याची सवय आता अजिबात चालणार नाही, हे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सध्या दिसत असलेल्या राजकीय वादळावरून स्पष्ट झाले आहे.

गेली अनेक वर्षे सत्तेत ठाण मांडून बसलेल्या संचालकांना घरी बसवण्यासाठी आणि त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सभासदांसमोर आता अनेक भक्कम पर्याय उपलब्ध झाले आहेत. याचाच प्रत्यय उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतून आला आहे. ७ ते ११ सप्टेंबर या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत तब्बल ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या छाननीनंतर आता २१ जागांसाठी तब्बल ५१४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून प्रस्थापितांच्या विरोधात विविध गट समोरासमोर आले आहेत. छाननीनंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून २७५, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) कडून १३०, भाजपकडून १०३, शिवसेना (शिंदे गट) कडून ४८, शिवसेना (ठाकरे गट) कडून ५ तर (४० अपक्ष, यात अजित पवार गटाचेच अनेक उमेदवार आहेत अशी माहिती) उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

यातच सत्ताधारी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाकडून तब्बल २७५ जणांनी उमेदवारी मागितली असून, यामध्ये जवळपास ३६ महिलांचा समावेश आहे. २६ ते ३० सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. इच्छुकांची ही प्रचंड गर्दी आणि अंतर्गत चढाओढ पाहता, या २७५ जणांमधून केवळ २१ उमेदवार निवडण्याची मोठी कसोटी आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेतृत्वापुढे असणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांमुळे सत्ताधारी गटामध्येच मोठी बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच, सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचा रंग आता पूर्णपणे बदलला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आता थेट आणि कडवा संघर्ष उभा राहिला आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्यांना खाली खेचण्यासाठी सभासदांनी कंबर कसली असून, एकाधिकारशाहीला कंटाळलेला सभासद आता उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमधून कोणाच्या हाती कारखान्याची सत्ता देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एवढे मात्र नक्की की, प्रस्थापितांसाठी ही निवडणूक आता साधीसुधी राहिलेली नसून, त्यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे