अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
बारामती तालुक्यातील ढाकाळे परिसरातील रस्त्यांची अवजड वाहतुकीमुळे दयनीय अवस्था; नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात

0
8
3
4
7
7
बारामती: बारामती तालुक्यातील ढाकाळे रोड (लांडा महादेव रस्ता) आणि परिसरातील इतर मुख्य रस्त्यांची रात्रंदिवस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, हे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या परिसरातील बहुतांश नागरिक हे शेतकरी आणि कामगार वर्गातील आहेत. वाड्या-वस्त्यांवरून गावाकडे आणि मुख्य रस्त्याकडे जाण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य, खते आणि उत्पादित भाजीपाला याच खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून वाहतूक करून न्यावा लागतो. याशिवाय परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज सायकलवरून शाळेत जातात, तर काही पालक आपल्या पाल्यांना दुचाकीवरून शाळेत सोडतात. रस्त्यावरील खड्ड्यांमधून सायकल किंवा दुचाकी घसरून विद्यार्थ्यांचा गंभीर अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या लोणीभापकर रस्त्याचे काम चालू असल्याने ढाकाळे रस्त्यावर स्टोन क्रशिंग आणि मुरूम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. डंपर आणि ट्रकद्वारे दगड, कच आणि मुरूम यांची रात्रंदिवस वाहतूक होत असल्याने या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा प्रचंड ताण येत आहे. या अवजड वाहनांचे चालक दुचाकी किंवा चारचाकी सारख्या लहान वाहनांचा कोणताही विचार न करता अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.




