गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
धक्कादायक! विश्वासघातकी ड्रायव्हरनेच रचला डॉक्टरांच्या अपहरणाचा कट; १९ लाखांची खंडणी उकळणारी टोळी जेरबंद

0
4
7
3
2
9
पुणे (उरुळी कांचन): ज्याच्या हाती गाडीचे स्टेअरिंग आणि जीवाचा विश्वास सोपवला, तोच ड्रायव्हर काळ बनून उभा राहिला तर? उरुळी कांचन येथे एका डॉक्टरांच्या बाबतीत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर डॉक्टरांचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून १९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड खुद्द डॉक्टरांचा ड्रायव्हरच निघाला असून, पोलिसांनी १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, रा. कुंजीरवाडी) हे दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास आपल्या कारने उरुळी कांचनकडून कुंजीरवाडीकडे जात होते. त्यांच्या गाडीवर राजेंद्र छगन राजगुरु हा ड्रायव्हर होता. गाडी इनामदार वस्तीजवळ आली असता, अचानक एका पांढऱ्या रंगाच्या ‘इर्टिगा’ कारने डॉक्टरांच्या गाडीला आडवे येत रस्ता अडवला.
त्या इर्टिगा कारमधून चार अज्ञात इसम खाली उतरले. त्यांनी डॉक्टरांच्या गाडीत घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांचे अपहरण करून त्यांना शिंदवणे बाजूकडे नेले. तिथे त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत ४ लाख रुपये काढून घेतले. मात्र, आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी डॉक्टरांकडे आणखी १५ लाखांची मागणी केली आणि “पैसे न दिल्यास जीवे ठार मारू” अशी धमकी देऊन चौफुला येथे सोडून दिले. घाबरलेल्या डॉक्टरांनी १२ जानेवारीला आरोपींना १५ लाख रुपये दिले. अशा प्रकारे एकूण १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली.
डॉक्टरांनी १४ जानेवारीला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि उरुळी कांचन पोलिसांची पथके तयार केली.
तपासादरम्यान फिर्यादी आणि साक्षीदारांकडे चौकशी करत असताना पोलिसांना डॉक्टरांचा ड्रायव्हर राजेंद्र राजगुरु याच्या हालचालींवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे गुन्ह्याची कबुली दिली. त्यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाचे अपहरण करून पैसे उकळण्याचा हा कट रचला होता.





