गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
इंदापूर: संत बाळूमामांच्या पालखी दर्शनाला गेले अन् घर साफ! १९ लाखांच्या घरफोडीचा वालचंदनगर पोलिसांकडून पर्दाफाश
वालचंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) मोठी संयुक्त कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील अट्टल चोरटा गजाआड; पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न फसला. चोरीला गेलेले सोने-चांदी आणि रोख रकमेसह तब्बल १९,७१,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

0
6
7
7
9
9
इंदापूर (पुणे) : घरातील सर्वजण संत बाळूमामांच्या पालखीच्या आरतीसाठी गेल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून तब्बल १९ लाखांहून अधिक रकमेचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. वालचंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांनी संयुक्त कारवाई करत या गुन्ह्याची उकल केली असून, आरोपीकडून १९ लाख ७१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी इंदापूर तालुक्यातील कळंब (डोंबाळे वस्ती) येथे संत बाळूमामांची पालखी मुक्कामासाठी आली होती. फिर्यादी राहुल दत्तात्रय डोंबाळे (वय ३५) यांच्यासह गावातील सर्व लोक पालखीच्या आरतीसाठी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातील सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १९,१६,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये बी.एन.एस. कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे ग्रामीणमध्ये वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास पथके वेगाने कामाला लागली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणासोबतच पोलिसांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.
दरम्यान, भवानीनगर येथील बाजारपेठेत एक अनोळखी व्यक्ती (अंगात गडद निळ्या-काळ्या रंगाच्या पट्ट्याचा शर्ट आणि खाकी पँट) स्थानिक नागरिकांना “बिना पावतीचे सोने घेणारा ज्वेलर्स कोणता आहे?” अशी विचारपूस करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून वालचंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ तिथे पोहोचले. भवानीनगर कारखान्यासमोर पोलिसांची चाहूल लागताच या संशयिताने लाकडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपले नाव बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील (वय २७ वर्षे, रा. सध्या मौजे पुनगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे सांगितले. त्याने कळंब येथील घरफोडीची कबुली दिली असून दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली. आरोपीच्या तपासात त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
-
११.५ तोळे सोन्याचे दागिने: ₹१६,१८,५००
-
चांदीचे दागिने: ₹३,२८,१००
-
रोख रक्कम: ₹२५,०००
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१९,७१,६०० सदर आरोपीवर कोल्हापूर जिल्ह्यातही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि राजकुमार डुणगे करत आहेत.
ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोसई बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, कीर्तीलाल गायकवाड, दादासाहेब डोईफोडे, स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर आणि गणेश वानकर यांनी सहभाग घेतला.






