Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

‘उत्सवात डीजे नको, संस्कृतीचा नाद घुमू द्या’ नियम मोडणाऱ्या डीजे चालकांवर बारामती पोलिसांची धडक कारवाई तीन मोठ्या मिरवणुकांमधील नियमभंगाप्रकरणी १७ मालक-चालकांवर गुन्हे दाखल

बारामती शहर पोलिसांचा कर्णकर्कश डीजेला दणका तीन मोठ्या मिरवणुकांमधील नियमभंगावर कारवाई; डीजे सिस्टीमसह वाहने जप्त, १७ मालक व चालकांवर गुन्हे दाखल

0 8 6 1 7 4

​बारामती: “कायद्यापेक्षा DJ मोठा नाही, उत्सवात कर्णकर्कश आवाजाऐवजी संस्कृतीचा नाद घुमू द्या,” असा स्पष्ट इशारा देत बारामती शहर पोलिसांनी अनियंत्रित आणि बेकायदेशीर डीजे (DJ) वापराविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत शहरातील सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये डीजे मालक, चालक आणि आयोजकांवर कठोर कारवाई केली आहे. एका प्रकरणात तर डीजे सिस्टीमसह संपूर्ण वाहनच पोलिसांनी जप्त केले आहे.

​बारामती शहरातील धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक मिरवणुका शांततेत व सलोख्याने पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने ही कडक पावले उचलली आहेत.

पोलिसांनी केलेल्या प्रमुख कारवाया

​१. कारवाई १: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक (२५ जणांवर गुन्हा)

१३ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत शिवाजी चौक व इंदापूर चौक परिसरात मोठ्या आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी आणि सार्वजनिक शांततेस बाधा आणल्यावरून एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​२. कारवाई २: अण्णाभाऊ साठे जयंती (वाहन व सिस्टीम जप्त)

२ ऑगस्ट २०२६ रोजी गुणवडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत कर्णकर्कश डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावरून वाद व मारहाण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल न करता, डीजे सिस्टीमसह ते बसवलेले टाटा कॅरियर वाहन (MH-20-EG-5351) जागेवरच जप्त केले. या वाहनाच्या बेकायदेशीर बदलांबाबत (Modification) आरटीओ (RTO) कडूनही कारवाई सुरू आहे.

​३. कारवाई ३: ईद-ए-मिलाद मिरवणूक (१७ डीजे मालक/चालकांवर गुन्हा)

२६ ऑगस्ट २०२६ रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीपूर्वी पोलिसांनी डीजे मालकांना प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी प्रत्यक्ष सांगूनही डीजे बंद न केल्याने १७ डीजे मालक आणि चालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अन्वये थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सर्व डीजे सिस्टीम पुराव्यानुसार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

डीजे मालक व आयोजकांना कडक इशारा

केवळ सिस्टीम भाड्याने दिली किंवा आयोजकांनी आवाज वाढवायला सांगितला, अशी सबब सांगून डीजे मालक किंवा ऑपरेटरला कायदेशीर कारवाईतून सुटता येणार नाही. प्रत्यक्ष भूमिका, नियंत्रण आणि पोलिसांच्या आदेशाची अवज्ञा या सर्वांचा विचार करून मालक, चालक आणि आयोजक या सर्वांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

स्पर्धा असावी; संघर्ष नसावा. संस्कृती असावी; कायद्याची अवज्ञा नसावी. नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करून डीजे ऐवजी ढोल, ताशा, लेझीम, हलगी अशा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. यामुळे तरुणांमध्ये शिस्त आणि संघभावना वाढीस लागते.

ही धडक मोहीम पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, स.पो.नि. शशिकांत इंगवले, तसेच उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, अजित पाटील, अशोक राऊत, रत्नदीप भंडारे व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

“शांतता राखणाऱ्याला संरक्षण; कायदा मोडणाऱ्यावर कारवाई” हे सूत्र बारामती पोलिसांनी अवलंबले असून, नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.

 

प्रत्यक्ष मिरवणूक बंदोबस्तादरम्यानदेखील DJ/Sound Systems तात्काळ बंद करण्याचे निर्देश देऊनही त्यांचे पालन न केल्याच्या आरोपावरून बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये पुढील १७ DJ/Sound System मालक/चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

१. अभि ७७ एल्स बारामतीवाला – अभिषेक गोविंद फुलारे, सातारा.

२. गुरुदत्त ऑडीओ साऊंड – हसीम लालाभाई सय्यद, निरा, ता. पुरंदर.

३. जयश्री साऊंड चिखलीवाला – दिलीप शिवाजी दळवी, चिखली, ता. इंदापूर.

४. अमर साऊंड सिस्टीम – चैतन्य संदीप चांदगुडे, कसबा, बारामती.

५. इम्पॅक्ट साऊंड सिस्टीम – प्रविण विजय शिंदे, सांगली.

६. अनिकेत साऊंड सिस्टीम – विशाल निवृत्ती जगताप, उंडवडी, बारामती.

७. डी. एन. ऑडीओ साऊंड सिस्टीम – आकाश रामा काळेल, जांभुळणी, ता. माण.

८. गरुडा साऊंड – संतोष किसन मेघावत, पाषाण, पुणे.

९. एस. आर. एस. पुणे हडपसर – आकीब नदाफ, सोलापूर.

१०. आण्णा कंपनी साऊंड सिस्टीम – निशांत नितीन शिंदे, सोलापूर.

११. चांदतारा साऊंड सिस्टीम – तैसिफ मुन्ना अत्तार, विडणी, फलटण.

१२. चिंतामणी साऊंड सिस्टीम – सचीन संजय बोराटे, झारगडवाडी, बारामती.

१३. एस. के. साऊंड सिस्टीम – संजय बाळासो तांबे, पाहुणेवाडी, बारामती.

१४. विजयन ऑडीओ साऊंड सिस्टीम – निखील अजिनाथ सोनवणे, सातववस्ती, बारामती.

१५. राजमुद्रा ऑडीओ साऊंड – आप्पासो बाळासो भोंडवे, काळखैरेवाडी, सुपा.

१६. प्रदीप ऑडीओ साऊंड – शुभम संजय गुंजाळ, रविवारपेठ, फलटण.

१७. नागे साऊंड सिस्टीम – सत्यम सूर्यकांत नागे, मल्हार पेठ, सातारा.

सदर गुन्ह्याची फिर्याद पोलीस शिपाई अमोल रावसाहेब देवकाते, यांनी सरकारतर्फे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे