गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज: सुपा पोलिसांचा थरारक सिनेस्टाईल पाठलाग; अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका!
लाल रंगाची स्विफ्ट कार, धावता पाठलाग आणि पोलिसांची चोख नाकाबंदी! बारामती तालुक्यातून अपहरण झालेल्या तरुणाला सुपा पोलिसांनी अवघ्या काही तासांत दिवेघाटात शोधून काढले.

0
7
1
0
4
1
बारामती/पुणे (दि. ०७ जून २०२६): सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी एका थरारक अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला. बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील ऋषिकेश विजय चांदगुडे या तरुणाचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले होते. मात्र, सुपा पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली असून, दोन मुख्य आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

दिनांक ०७/०६/२०२६ रोजी सुपा पोलिसांना ऋषिकेश चांदगुडे याच्या अपहरणाची धक्कादायक माहिती मिळाली. लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून (क्र. MH-42-BJ-4445) ओंकार प्रकाश भोसले आणि तन्मय सुधीर साळुंखे यांनी ऋषिकेशला जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि सासवडच्या दिशेने पोबारा केला.
माहिती मिळताच, सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता एक विशेष आणि ताकदवान पथक तयार केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलीस स्टेशनला तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले.
तपासाला गती मिळत असतानाच कुलदीप चांदगुडे यांना एक मोबाईल कॉल आला. या एका कॉलने तपासाची दिशा स्पष्ट केली. पोलिसांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) सुरू केले आणि आरोपींचे लोकेशन ‘दिवेघाट’ परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.

वेळ न घालवता पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, विशाल गजरे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई विलास वाघमारे आणि भाऊसाहेब चौधरी या पथकाने दिवेघाटाच्या दिशेने धाव घेत संशयित वाहनाचा थरारक पाठलाग सुरू केला.
पाठलाग सुरू असतानाच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांच्याशी संपर्क साधून मदत मागण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सासवडचे पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांचे पथक तातडीने मदतीला धावून आले.
या संयुक्त कारवाईत पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे स्विफ्ट कारला चारही बाजूंनी घेरून अडवण्यात पोलिसांना यश आले. वाहनाची झडती घेतली असता आतमध्ये ओंकार प्रकाश भोसले (वय २७), तन्मय सुधीर साळुंखे (वय २०) आणि दिव्या ओंकार भोसले (वय २२, सर्व रा. सातव चौक, बारामती) हे आढळून आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि अपहरण झालेल्या ऋषिकेश चांदगुडे याची सुरक्षितरित्या सुटका केली.
फिर्यादी ऋषिकेश विजय चांदगुडे यांच्या जबाबावरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. 119/2026 अन्वये बीएनएस कलम 140(1), 118(1), 115, 352, 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी ओंकार भोसले आणि तन्मय साळुंखे यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ०४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश (दिनेश) कोळी करत आहेत.
ही धडक आणि यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रत्यक्ष कारवाईत सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या नेतृत्वाखाली
खालील विशेष पथकाने अतुलनीय कामगिरी बजावली:
अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी
पोलीस हवालदार: विशाल गजरे, रुपेश साळुंखे, संदीप लोंढे
महिला पोलीस हवालदार: दिपाली मोहिते
पोलीस शिपाई: सागर वाघमोडे, संतोष जावीर, भाऊसाहेब चौधरी, सचिन दरेकर, विलास वाघमारे
चालक पोलीस शिपाई: सोमनाथ होले





