बारामती: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत दोन गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून तब्बल ४५० जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बाँड घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ (१) (ब) प्रमाणे बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्षय शांताराम देवकाते (रा. महालक्ष्मी शोरूमचे पाठीमागे, बारामती) यास संपूर्ण पुणे जिल्ह्यातून ०३ महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.
तसेच
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर ऊर्फ नाना भीमराव भोंग (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यास इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यातून ०३ महिने कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बीएनएसएस कलम १२६ अन्वये ४५० इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे अंतिम बाँड घेण्यात आले आहेत.
तसेच बीएनएसएस कलम १२९ अन्वये २६ इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले आहेत. अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३-ब अन्वये ३६ इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, तर बीएनएसएस कलम १६३ अन्वये ५७ इसमांविरुद्ध मनाई आदेश काढण्यात आले आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, त्यांना शासन व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन, ध्वनिक्षेपकाचा नियमबद्ध वापर, वाहतूक व्यवस्था आणि महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळे आणि मिरवणूक मार्गांवर आवश्यक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सदर उपाययोजना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करावा तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बारामती उपविभागीय पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा