बारामती : बारामती तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ५२ वर्षीय नराधमाने स्वतःच्याच नात्यातील अवघ्या १२ ते १३ वर्षांच्या एका असहाय्य मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून ती कोवळी मुलगी गरोदर राहिल्यानंतर, प्रकरण अंगाशी येईल या भीतीने एका खाजगी रुग्णालयात तिचा बळजबरीने गर्भपातही करण्यात आला. या भयंकर घटनेने संपूर्ण बारामती तालुका हादरला असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या नात्यातीलच आहे. नात्याचा आणि मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत या नराधमाने अत्यंत कोवळ्या वयात असलेल्या या मुलीचा शारीरिक उपभोग घेतला. केवळ अत्याचार करून तो थांबला नाही, तर त्या लहान जीवाला सतत धमकावून त्याने हे कृत्य वारंवार केले. या अमानुष अत्याचारामुळे ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. गर्भधारणेपासून ते गर्भपातापर्यंतच्या संपूर्ण काळात त्या चिमुकलीला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर अतोनात यातना सहन कराव्या लागल्या. प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल केले आणि तिचा गर्भपात घडवून आणला. याच गर्भपाताच्या घटनेनंतर हा सर्व भयानक प्रकार उजेडात आला.
ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला. संतप्त जमावाने या नराधमाला गाठून त्याला यथेच्छ चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत, कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर सोपस्कार आणि तपास युद्धपातळीवर सुरू आहेत.
संपादकीय भाष्य: समाजातील ‘विकृत मानसिकतेचा’ प्रश्न ऐरणीवर
आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला कठोर शिक्षाही मिळेल; परंतु या घटनेने एक अतिशय ज्वलंत आणि संवेदनशील प्रश्न समाजासमोर उभा केला आहे—तो म्हणजे माणसांमधील ‘वाढती विकृत मानसिकता’.
१२-१३ वर्षांच्या चिमुकलीकडे कामवासनेच्या नजरेने पाहणाऱ्या आणि नात्यांच्या पवित्रतेला काळिमा फासणाऱ्या या मानसिकतेला काय म्हणावे? जेव्हा समाजातील व कुटुंबातील,नात्यातील रक्षकच भक्षक बनतात आणि घराचा उंबराही सुरक्षित उरत नसेल, तेव्हा समाजाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.
कायदे आणि पोलीस प्रशासन त्यांचे काम करतीलच, परंतु अशी मानसिकता मुळातून नष्ट करण्यासाठी सामाजिक प्रबोधन, लहान मुलांचे सुरक्षिततेबाबतचे समुपदेशन आणि अशा गुन्ह्यांबद्दल समाजात वचक निर्माण करण्याची नितांत गरज आहे. या घटनेने केवळ एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर समाजाच्या नैतिकतेवरच एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा