बारामती (प्रतिनिधी): पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती शहर पोलिसांनी एका आंतरराज्यीय गांजा तस्कर टोळीचा मोठा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ६३४ किलोग्रॅम वजनाचा गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा (३,०३,९६,०००/-) मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ७ सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडोबाची वाडी रोडवरील एका प्लास्टिकच्या दुकानातून या कारवाईची सुरुवात झाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून तब्बल ४७८.९६० किलो वजनाचा गांजा (किंमत २,३९,४७,५००/- रुपये) जप्त केला होता. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा (गु.र.नं. ७८/२०२६) दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.

तपासादरम्यान मुख्य सूत्रधार छत्तीसगडमधून गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन संशयित इनोव्हा कारवर पाळत ठेवली.
१. दुसरी कारवाई (शिरवळ हद्द): पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळ नजीक एका इनोव्हा कारचा पाठलाग करून पोलिसांनी १३४ किलो गांजा (किंमत ३३,५५,०००/- रुपये) जप्त केला. या कारवाईत मुख्य आरोपी विवेक ऊर्फ पप्पू विजय कांबळे याला अटक करण्यात आली.
२. तिसरी कारवाई (बारामती हद्द): सुहास फलटण टोलनाक्याजवळ दुसऱ्या इनोव्हा कारला (MH 12 EZ 4949) अडवून पोलिसांनी २१ किलो गांजा (किंमत १२,६५,०००/- रुपये) जप्त केला व तिघांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. प्रकाश ऊर्फ पाक्या मोहन काळे (वय २९, रा. कल्याणनगर, ता. बारामती)
२. समाधान धर्मराज गायकवाड (वय २४, रा. सांगवी, ता. बारामती)
३. शिवकुमार मुन्ना सिंग (वय २४, रा. बिहार)
४. राहुल कल्याण गोरे (वय २७, रा. धाराशिव)
५. विवेक ऊर्फ पप्पू विजय कांबळे (वय ३२, रा. ता. बारामती)
६. हुसेन सुखदेव लकारे (वय ३५, रा. कोथरूड, पुणे)
७. आदित्य विकास शिंदे (वय २०, रा. कोथरूड, पुणे)
८. युवराज ज्ञानेश्वर दुर्गा (वय २०, रा. मुळशी, पुणे)
आरोपी विवेक कांबळे व त्याचे साथीदार छत्तीसगड राज्यातून स्वस्तात गांजा खरेदी करून तो महाराष्ट्रात आणत असत. सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागात ते छुप्या मार्गाने या गांजाची चढ्या भावाने विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, स्था. गु.शा.चे सपो कुलदीप संकपाळ, ग्रेड पोसई बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, स्वप्निल अहीव निलेश शिंदे, अजय घुले, बारामती शहर पो स्टे कडील पोसई रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, अक्षय सिताप, विशाले शिंदे, सागर जामदार, बाळासो झणझणे, यांनी केली आहे.
महत्त्वाची नोंद:
समाजातील वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा