Breaking
अपघातअभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर-मुढाळे रोडवर भूमिगत गटारीची तुटलेली झाकणे ठरताहेत अपघाताचा सापळा! प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता बंद करण्याचा स्थानिक नागरिकांचा इशारा

0 8 3 9 4 8

वडगाव निंबाळकर: निरा-बारामती मुख्य रस्त्यालगत आणि वडगाव निंबाळकर-मुढाळे रोडवरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत गटारीचे चेंबर आणि त्यांची झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या तुटलेल्या झाकणांमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

निरा-बारामती मुख्य रस्त्यावरून गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूच्या गटारीचे दोन मुख्य चेंबर धोकादायक अवस्थेत आहेत. एका गोल चेंबरचे झाकण पूर्णपणे तुटून गटारीच्या आतमध्ये कोसळले आहे. तर दुसऱ्या मोठ्या आणि आयताकृती चेंबरचे झाकणही तुटलेले आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून आजूबाजूला आणि चेंबरवर मोठे दगड ठेवण्यात आले आहेत.

हे चेंबर रस्त्याच्या समतल नसून वरच्या बाजूला उंचावलेले असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. एखाद्या दुचाकी किंवा सायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्यास, किंवा चारचाकी वाहन या दगडांवर आदळल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. जर येथे अपघात झाला आणि कोणाला शारीरिक इजा पोहोचली, तर यास जबाबदार कोण, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

या परिसरात अनेक व्यावसायिक दुकाने असल्याने येथे दररोज नागरिकांची आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असते. मात्र, चेंबरची झाकणे तुटलेली असल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे येण्या-जाणाऱ्या नागरिकांना आणि स्थानिक दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

गावातील भूमिगत गटारींची देखभाल करणारी यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन या अत्यंत गंभीर व निकडीच्या समस्येकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करत आहे, असा उद्विग्न सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन दोन्ही चेंबरची तातडीने दुरुस्ती करून नवीन मजबूत झाकणे बसवावीत आणि ही झाकणे रस्त्याच्या समतल राहतील याची काळजी घ्यावी. तसेच रस्त्यावरील दगड हटवून वाहतूक पूर्णपणे सुरक्षित करावी अशी मागणी होत आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर यावर योग्य ती उपाययोजना केली नाही, तर येथील तुटलेली झाकणे व दगड उचलून बाहेर फेकून दिले जातील आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल, असा सज्जड इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे