महाराष्ट्रराजकिय
दादांनी डोळे झाकून एका व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला आणि त्यांनी असे कसे केले याचे वाईट वाटते. दादा ज्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळवून द्यायचे, तसाच न्याय सर्वांना मिळाला पाहिजे, जय पवार यांचा सोमेश्वर कारखान्याच्या सभेत एल्गार

0
9
4
9
2
1
सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजित दादा पवार पॅनेल’ची प्रचाराची सांगता सभा काल संपन्न झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अत्यंत भावनिक आणि नाविन्यपूर्ण मुद्द्यांना हात घालत उपस्थितांची मने जिंकली.
सभासद हेच कारखान्याचे खरे मालक असल्याचे अधोरेखित करत येणाऱ्या काळात कारखान्याच्या कार्यालयात प्रवेशासाठी RFID कार्ड आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गावोगावी फिरताना काही सभासदांनी कारखान्यात गेल्यावर चहा पण दिला जात नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
त्यावर उपाय म्हणून आणि सभासदांचा सन्मान राखण्यासाठी एक अभिनव संकल्पना जय पवार यांनी मांडली. ते म्हणाले की, सर्व सभासदांना ‘आर एफ आय डी’ (RFID) आयडी कार्ड बनवून दिले जाईल आणि कारखान्याला एक नवीन दरवाजा उभारण्यात येईल. तिथे नुसते कार्ड टच केले की सभासद थेट आतमध्ये जाऊ शकतील, त्यांना कोणासाठीही थांबायची गरज पडणार नाही, कारण हे सभासदच कारखान्याचे सर्वात मोठे मालक आहेत.
आजच्या सभेसाठी आपले सर्व उमेदवार सभासदांचे स्वागत करण्यासाठी सभेच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर उभे राहिले हि गोष्ट मोठी आहे,कारण कारखाना सभासदांमुळे चालतो आणि त्यांच्यामुळेच उत्तम चालेल, याची जाण पॅनेलला आहे.

अजित दादांनी आयुष्यभर जातीपातीचे कधीच राजकारण केले नाही आणि विरोधकांचा ऊस असला तरी आपण त्यांची काळजी घेणार, हीच दादांची भूमिका होती. कारखाने आणि संस्था या केवळ संचालकांमुळे नाही, तर शेतकरी आणि सभासदांमुळे चालतात असे हि त्यांनी स्पष्ट केले.
गावोगावी फिरताना लोकांनी सांगितले की, दादांनी स्वतः फोन लावून विद्यमान चेअरमनला खूप वेळा कामे सांगितली होती, तरीही ती कामे झाली नाहीत. दादा आमच्यासाठी बाकीची खूप कामे करायचे म्हणून आम्ही ते जाऊ दिले, पण आज लोकांच्या मनात याबद्दल तीव्र भावना आहेत.
दादांनी डोळे झाकून एका व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला आणि त्यांनी असे कसे केले, याचे वाईट वाटते. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार असला तरी, दादांसारखा कोणताही स्वार्थ नसलेले आपलाच दादांच्या विचारांचा पॅनेल आहे.
दादांच्या आठवणींना उजाळा देताना जय पवार यांनी एक अत्यंत भावनिक प्रसंग सांगितला.
दादांचा जेव्हा अपघात झाला, तेव्हा त्यांच्या खुर्चीच्या बाजूला केवळ कामाचेच कागदपत्र होते. सकाळी ६ वाजता उठून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या दादांना विचारले असता ते म्हणायचे,
“पहिले बारामती आणि नंतर सगळी महाराष्ट्रातली जनता हेच आपले कुटुंब आहे”.
दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ‘आमचे लाडके दादा’ असे पोस्टर लागले होते, दादांनी स्वतःच्या कुटुंबाला वेळ देण्याऐवजी जनतेसाठी वेळ दिला. अपघातानंतर १३ दिवसांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र भेटायला येत होता, तेव्हाच आपणही दादांप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटणार असल्याचा निश्चय केल्याचे जय पवार म्हणाले.





