अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
गुन्ह्यापूर्वीच हवा प्रतिबंध: बारामती पोलिसांची आर्त हाक; संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा बदल काळाची गरज

0
7
0
3
3
9
बारामती/पुणे: शहरांचा झपाट्याने होत असलेला विकास, उभ्या राहणाऱ्या नवीन वसाहती आणि व्यावसायिक संकुले यांच्या शर्यतीत नागरिकांची ‘इलेक्ट्रॉनिक सुरक्षा’ मात्र मागे पडत चालली आहे. “चोरी झाल्यानंतर आरोपी शोधण्यापेक्षा चोरी होऊच न देणे अधिक महत्त्वाचे आहे,” असा अत्यंत महत्त्वाचा संदेश देत बारामती पोलिसांनी नागरिकांना आणि प्रशासनाला सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. आजची ही हाक केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक ‘प्रतिबंधात्मक उपाय’ म्हणून पुढे आली आहे.

वाढत्या सोन्याच्या भावामुळे आणि बदलत्या गुन्हेगारी पद्धतीमुळे एका सामान्य कुटुंबाची अनेक वर्षांची बचत काही मिनिटांत लुटली जात आहे. चोरी झाल्यानंतर “पोलीस काय करत होते?” असा साहजिक प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो. परंतु, यामागील खरी वस्तुस्थिती पोलिसांनी अत्यंत मुद्देसूदपणे मांडली आहे.
आजचे चोरटे अत्यंत चलाख झाले आहेत. ते मुख्य रस्त्यांवर गुन्हे करण्याऐवजी अशा अरुंद गल्ल्या, झोपडपट्ट्या आणि अंधाऱ्या परिसरांचा वापर करतात, जिथे पोलिसांची वाहने पोहोचू शकत नाहीत आणि जिथे कोणतीही ‘इलेक्ट्रॉनिक नजर’ (सीसीटीव्ही) नसते. आजच्या आधुनिक तपासात सीसीटीव्ही कॅमेरा हा सर्वात मोठा साक्षीदार आहे. गुन्हेगार कोणत्या वाहनाने आले, कोणत्या दिशेने पळून गेले आणि कुठे लपले, या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कॅमेऱ्यात मिळतात. परंतु, अनेक संवेदनशील ठिकाणी कॅमेरे नसल्यामुळे तपासात मोठे अडथळे निर्माण होतात. पोलीस रात्रंदिवस गस्त घालतात, संशयितांचा पाठलाग करतात, मात्र ज्या ठिकाणी एका कॅमेऱ्यामुळे काही मिनिटांत धागा मिळू शकतो, तिथे पुराव्याअभावी पोलिसांचे अनेक दिवस खर्च होतात.
चोरीला गेलेला ऐवज हा केवळ पैसा नसतो. त्यात एका वृद्ध आईच्या लग्नातील दागिन्यांच्या आठवणी असतात, एखाद्या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी साठवलेले सोने असते, तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यभराचे कष्ट असतात. गुन्हा उघडकीस आला आणि आरोपी पकडले गेले, तरी त्या कुटुंबाने भोगलेली मानसिक वेदना कधीच भरून निघत नाही. म्हणूनच, “चोरी झाल्यानंतर नव्हे, तर चोरी होण्यापूर्वीच प्रतिबंध हवा,” ही काळाची गरज आहे.




