Breaking
महाराष्ट्रराजकिय

विरोधकांवर टीका करण्यापेक्षा शासनाच्या योजनांचे लाभार्थी शोधा; नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ​वडगाव निंबाळकर येथे भारतीय जनता पक्ष संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा संपन्न

0 6 3 1 7 1

वडगाव निंबाळकर : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ वडगाव निंबाळकर येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बैठक मेळावा आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा बारामती विधानसभा मतदारसंघ दक्षिण मंडलामध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

​कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भारतीय जनता पार्टी बारामती तालुका दक्षिण मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील माने यांनी आपल्या मंडळ कार्यक्षेत्रात केलेल्या संघटनात्मक कार्याचा आणि विकासकामांचा सविस्तर आढावा मांडला

 

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोधकांवर आणि मतदारसंघाबाहेरील उमेदवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “मतदारसंघात ९३ बूथ आहेत. कागदोपत्री एका बूथवर साधारण एक हजार मतदार असले, तरी प्रत्यक्ष मतदान ८०० पर्यंत होते. उर्वरित मतदारांपैकी काही मयत असतात तर काही स्थलांतरित झालेले असतात. या विधानसभेत एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत, ज्यापैकी अनेक जण मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. हे उमेदवार कोण आहेत? कुठून आले आहेत? त्यांचे पत्ते काय आहेत? हे शोधून काढणाऱ्या कार्यकर्त्याला मी ‘कॅडबरी’ बक्षीस देईन.” या उमेदवारांचा निवडणुकीत उभे राहण्यामागचा हेतू काय आहे आणि त्यांना नक्की काय विकास करायचा आहे, याची माहिती घेऊन एक ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार करण्याचे आवाहनही त्यांनी उपहासात्मक शैलीत केले.

निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मतदारांना बाहेर काढण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. “सध्या कडक उन्हाळा असल्याने मतदारांना सकाळी लवकर मतदानासाठी प्रवृत्त करा आणि विक्रमी मतदान घडवून आणा. गावोगावी जाऊन विरोधकांवर टीका करत बसण्यापेक्षा सरकार म्हणून आपण केलेले काम लोकांसमोर मांडा. बारामती विधानसभेतील ३.८७ लाख मतदारांपैकी ज्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला आहे, अशा लाभार्थ्यांचा शोध घ्या. शेतकऱ्यांसाठीच्या योजना, ‘लाडकी बहीण’ योजना, आणि मुलींची शालेय फी माफ केल्यामुळे राज्यात नव्याने प्रवेश घेतलेल्या ७३ हजार मुलींची आकडेवारी लोकांपर्यंत घेऊन जा. या योजनांचा फायदा कसा झाला, हे लाभार्थ्यांना विचारून त्यांना सरकारच्या कामाची जाणीव करून द्या, तीच लोकं तुम्हाला मतदान करतील,” असा विजयाचा मंत्र त्यांनी दिला.

देशात आणि राज्यात आजवर कोणीही मिळवला नसेल एवढा मोठा आणि विक्रमी विजय महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांना मिळवून द्या, असे ठाम आवाहन ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

​या महत्त्वपूर्ण मेळाव्याचे प्रास्ताविक दक्षिण मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील माने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. निलेश साळवे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे