Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कॉल’ येताच पोलीस हजर! बारामती पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स’मुळे वाचला जीव; प्राणघातक हल्ल्यातील दोन हल्लेखोर अटकेत

हॉटेलच्या बिलावरून बारामतीत एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे  हॉटेल चालकाचे प्राण वाचले,  या तत्पर कारवाईत दोन आरोपी गजाआड मुख्य आरोपी अक्षय जगतापसह दोघे फरार; शोधमोहीम तीव्र, 

0 5 5 5 3 3

बारामती: मोरगाव रोडवर हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून एका हॉटेल चालकावर लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमीला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर मुख्य आरोपीसह दोघे जण फरार आहेत.

महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय ५३, व्यवसाय – स्वप्नील हॉटेल, रा. खांडज, २२ फाटा, ता. बारामती) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री हॉटेलच्या बिलावरून गायकवाड आणि आरोपी अक्षय जगताप यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी मोरगाव रोडवरील ग्लोबल हॉटेलसमोर, प्रणव डिजीटल दुकानाजवळील मैदानात आरोपी अक्षय जगताप आणि त्याच्या साथीदारांनी गायकवाड यांना गाठले. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कुऱ्हाडीच्या दांडक्याने व लोखंडी रॉडने हल्ला करून उजव्या पायावर व छातीत गंभीर दुखापती केल्या. यावेळी एका साथीदाराने “कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ” अशी धमकी देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

या थरारक घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गायकवाड यांना वेळ न दवडता उपलब्ध वाहनातून बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. डॉक्टरांचे त्वरित उपचार आणि पोलीस दलाच्या अचूक व जलद निर्णयामुळे जखमी गायकवाड यांचा जीव वाचला.

या गंभीर घटनेनंतर बारामती शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी विक्रम जगताप (रा. खांडज, ता. बारामती) आणि जयदीप भागवत भोसले (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर भा.न्या.स. कलम १०९, ६१(२), ११८(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गंभीर गुन्हा (गु.र.नं. ७३/२०२६) दाखल करण्यात आला आहे. तर, मुख्य आरोपी अक्षय सुनिल जगताप (रा. माळेगाव कारखाना) व त्याचा साथीदार महादेव ऊर्फ भाऊ सुरेश जाधव (रा. ढवळेमळा) हे सध्या फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक (Special Task Force) नेमण्यात आले आहे.

 

ही धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पो. हवालदार सुलतान डांगे, अमोल शिंदे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, वैभव मदने, राहुल बडे आणि रईस मुलानी यांनी आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. भंडारे करत आहेत.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

फरार आरोपी अक्षय जगताप आणि महादेव जाधव यांच्याबद्दल कोणालाही खात्रीशीर माहिती असल्यास तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि कायदा स्वतःच्या हाती न घेता पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 संपादकीय मत 

“माहिती द्या, कारवाई आम्ही करू!” बारामती पोलिसांच्या तत्परतेचे उत्तम उदाहरण
एखाद्या गंभीर गुन्ह्याची किंवा अनुचित प्रकाराची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा किती वेगाने आणि प्रभावीपणे काम करू शकते, याचा उत्तम प्रत्यय बारामती शहर पोलिसांच्या ताज्या कारवाईतून आला आहे. “तुम्ही फक्त माहिती द्या, कारवाई आम्ही करू!” हा केवळ एक नारा नसून, ती बारामती पोलिसांची प्रत्यक्ष कार्यपद्धती बनली आहे, हे या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने सिद्ध केले आहे.
हॉटेल चालकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलीस पथकाने एका क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा पोलिसांचा जलद आणि अचूक निर्णय खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी’ ठरला. वेळेवर घेतलेला हा निर्णय आणि दाखवलेली संवेदनशीलता यामुळेच एका निष्पाप नागरिकाचे प्राण वाचू शकले.
केवळ जीव वाचवून पोलीस थांबले नाहीत, तर अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्याचे आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती पोलीस दल सदैव जागरूक आणि कटिबद्ध आहे, हा सामान्य जनतेचा विश्वास या घटनेतून अधिक दृढ झाला आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि समाजात सुरक्षिततेची भावना रुजवण्यासाठी बारामती पोलिसांनी बजावलेले हे कर्तव्य निश्चितच कौतुकास्पद आणि संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे