बारामती : माळेगाव हद्दीतील शिवनगर (ता. बारामती) येथे घरासमोरील कंपाऊंड विनापरवानगी ट्रॅक्टरने पाडून नुकसान केल्याची आणि जाब विचारणाऱ्या फिर्यादीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून कुटुंबाला दगडाने आणि हाताने मारहाण केल्याबद्दल पाच जणांवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी अविनाश बाळकृष्ण नरुटे (वय ३४ वर्षे, रा. शिवनगर, माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून रणजित लालासो ढोले, सुजित लालासो ढोले, तेजम सुनील ढोले, सुनील शंकर ढोले आणि बाळासो शंकर ढोले (सर्व रा. शिवनगर, माळेगाव, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी रणजित ढोले याने विना नंबरचा ट्रॅक्टर घेऊन येत फिर्यादी यांच्या घरासमोरील सिमेंट विटांच्या कंपाऊंडला ट्रॅक्टरच्या समोरील लोखंडी फरांडीने वारंवार धडक देऊन ते पाडले. यावेळी फिर्यादी अविनाश आणि त्यांचा भाऊ नंदकिशोर हे ट्रॅक्टर थांबवण्यासाठी गेले असता, आरोपी रणजित याने त्यांना गंभीर दुखापत करण्याच्या किंवा जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी, त्यांचा भाऊ नंदकिशोर, वडील बाळकृष्ण आणि आई सुजाता यांना दगडाने व हाताने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.
या घटनेनंतर अविनाश नरुटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११०, ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार लोंढे यांनी नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत सर्व आरोपींना तातडीने अटक केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा