Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगांव निंबाळकर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरात प्रशासनाचा गलथान कारभार; रणरणत्या उन्हात महिला आणि ज्येष्ठांचे हाल! महावितरणची ही ग्राहकांशी चेष्टा?

0 6 0 9 5 1

वडगाव निंबाळकर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने राबविण्यात येत असलेल्या एन.सी.एम.सी. (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरात आज वडगाव निंबाळकरमध्ये नियोजनाचा पूर्णतः फज्जा उडालेला पाहायला मिळाला. प्रशासनाच्या ढसाळ नियोजनामुळे आणि एसटी अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणा मुळे रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या शेकडो महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ८ वाजल्यापासून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे महत्त्वाचे काम करण्यासाठी एका खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे असे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार याची कल्पना असतानाही बारामती आगाराचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. सर्व कारभार खाजगी कर्मचाऱ्यांच्या हाती सोडून परिवहन विभागाने आपले हात झटकल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

महावितरणची ग्राहकांशी चेष्टा! वीज पुरवठा सतत खंडित

एकीकडे एसटी महामंडळाचा गलथान कारभार तर दुसरीकडे महावितरणचा बेजबाबदारपणा या शिबिरात पाहायला मिळाला. हे शिबिर सुरू असताना महावितरणने मात्र जनतेची, ग्राहकांची चेष्टा केल्याप्रमाणे प्रत्येक १०-१५ मिनिटांनी, अर्ध्या तासाने, तासाने सतत वीज पुरवठा खंडित केला. या सर्व प्रकारामुळे नोंदणी प्रक्रियेत तर खंड पडलाच, तसेच कार्यालयातील फॅन व इतर गोष्टी बंद पडल्याने नागरिकांना उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे लोकांचा मनस्ताप दुप्पट झाला.

संथगतीने चाललेले काम; सकाळी ८ पासून रांगा स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच गर्दी केली होती. अनेक महिलांनी आपल्या घरची कामे सोडून, तर ज्येष्ठांनी शेतीची कामे बाजूला ठेवून या रांगेत स्थान धरले. मात्र, दुपारचे ३ वाजले तरी केवळ १५० लोकांची नोंदणी पूर्ण होऊ शकली होती. संथगतीने चाललेले काम आणि वाढती गर्दी यामुळे ग्रामपंचायत परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.

कोणतेही शिबिर राबवताना लोकांच्या संख्येचा अंदाज घेऊन पुरेशी यंत्रणा लावणे आवश्यक होते. मात्र, बारामती परिवहन विभाग आणि महावितरण यांच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. प्रशासनाने यापुढे अशा योजना राबवताना योग्य उपाययोजना, पुरेशी यंत्रणा आणि अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वडगाव निंबाळकर येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे. जर गर्दीत किंवा उष्णतेमुळे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा महिलेला काही शारीरिक त्रास उद्भवला, तर त्याची जबाबदारी परिवहन विभाग आणि महावितरण घेणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे