गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
सासवड पोलिसांची दमदार कारवाई, भिवरीतील शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरीला गेलेली १८ जनावरे हस्तगत, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7
8
6
3
2
सासवड/पुरंदर : तालुक्यातील भिवरी येथील शेतकऱ्याच्या गराडे ढोणेवस्ती येथील गोठ्यातून चोरीस गेलेल्या १८ जनावरांच्या चोरीचा छडा लावण्यात सासवड पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी शिताफीने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि जनावरांसह गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा तब्बल २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, भिवरी येथील संतोष बापूसाहेब कटके यांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. गराडे ढोणेवस्ती येथे त्यांचा गोठा असून त्यात १२० गाई आणि म्हशी होत्या. १३ जुलै रोजी रात्री १० वाजता कटके हे नेहमीचे काम आटोपून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी १४ जुलै रोजी ते भावासोबत वीर येथे गेले असता, त्यांना महेंद्र जगदाळे यांनी फोन करून गोठ्यातून काही जनावरे कमी असल्याची माहिती दिली. कटके यांनी तातडीने गोठ्यावर जाऊन खात्री केली असता, गोठ्यातून मुऱ्हा जातीच्या ७ म्हशी, जाफराबादी जातीच्या २ म्हशी आणि एचएफ जातीच्या ९ जर्सी गाई अशी एकूण १८ जनावरे चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चोरीला गेलेल्या या जनावरांची किंमत १७ लाख १० हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी संतोष कटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच सासवड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शिवाजी महाराज चौकासह परिसरातील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. या तपासणीत एक टेम्पो संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा अचूक माग काढला. हा आरोपी खेड येथील बाजारात जनावरे विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सासवड पोलिसांनी थेट सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील फतरवाडी येथे धडक कारवाई करत छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेल्या उर्वरित गाई आणि म्हशी यशस्वीपणे हस्तगत केल्या. पोलिसांनी ७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० जर्सी गाई, १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या २ म्हशी, ८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ६ म्हशी आणि गुन्ह्यात वापरलेला १२ लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पो असा एकूण २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.




