Breaking
गुन्हेगारीमहाराष्ट्र

नाव दुष्काळी दौऱ्याचे, निशाणा सोमेश्वरवर! नीरा-बारामती रोडवरच का रंगला पवारांचा दुष्काळी संवाद?

0 9 3 5 2 5

बारामती : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र असताना शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचा पुरंदर-बारामती दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. वरकरणी हा दौरा दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी असल्याचे भासवले गेले, मात्र या दौऱ्याचा खरा राजकीय अजेंडा आणि स्वार्थ आता लपून राहिलेला नाही. बारामती तालुक्यातील खऱ्या दुष्काळी आणि होरपळणाऱ्या भागाकडे सोयीस्कर पाठ फिरवत, या दौऱ्याचा मुक्काम नीरा-बारामती रोडवरच का रेंगाळला? यामागील राजकीय गुपित आता उघड झाले असून, हा दुष्काळी दौरा नसून आगामी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची पेरणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरा दुष्काळी भाग वाऱ्यावर, नीरा-बारामती रोडवरच राजकीय ऊत
बारामती तालुक्यात असे अनेक भाग आहेत जिथे पाण्याचा थेंब नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. मात्र, खऱ्या दुष्काळी पट्ट्यात पाहणी दौरा अजिबातच दिसला नाही. त्याऐवजी नीरा-बारामती रोडवर कोऱ्हाळे बुद्रुकसारख्या ठिकाणी थांबून संवाद साधण्यात आला. यामागील साधे गणित असे की, याच पट्ट्यात सोमेश्वर साखर कारखान्याचे सर्वाधिक सभासद आणि मतदार एकवटले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यापेक्षा, कारखान्याच्या मतदारांच्या गराड्यात उभे राहून भाषणबाजी करणे अधिक सोयीचे आणि फायद्याचे ठरले आहे. शेतकऱ्यांना पाण्याची नव्हे, तर साहेबांना कारखान्याच्या सत्तेची तहान लागल्याची खोचक चर्चा आता या भागात रंगली आहे.

या तथाकथित दुष्काळी दौऱ्यात युगेंद्र पवारांनी अचानक बारामतीतील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर गळा काढायला सुरुवात केली. बारामतीत गुन्हेगारी वाढली असून महिला सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अचानक कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा का आठवला? यामागे थेट सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः अजित पवार गटाला कोंडीत पकडण्याची खेळी आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची प्रतिमा मलिन करणे आणि प्रशासनावर ताशेरे ओढून राजकीय पोळी भाजून घेण्याचा हा स्पष्ट प्रयत्न मानला जात आहे.

सोमेश्वर कारखान्याची सत्ता हेच खरे लक्ष्य
या दौऱ्याचे खरे राजकीय गुपित खुद्द युगेंद्र पवारांच्या भाषणातूनच उघड झाले. दुष्काळावर मोजके बोलून झाल्यावर त्यांचे मूळ भाषण सोमेश्वर कारखान्याभोवतीच फिरत राहिले. अजितदादांनी कारखाना चांगला चालवला हे मान्य करतानाच, त्यांच्या समर्थकांवर स्वार्थीपणाचा आरोप करत, आता हा कारखाना साहेबांच्या ताब्यात कसा द्यावा, याचे धडे त्यांनी सभासदांना दिले. नोकरभरतीतील पारदर्शकता आणि उसाला चांगला भाव देण्याचे आश्वासन देत त्यांनी थेट निवडणुकीचा जाहीरनामाही या दुष्काळी संवादात वाचून दाखवला.
थोडक्यात सांगायचे तर, शेतकऱ्यांच्या कोरड्या घशाला पाण्याचा आधार देण्याऐवजी, सोमेश्वरच्या निवडणुकीत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच या दौऱ्याचा घाट घातला गेला, हे आता बारामतीकरांच्या लक्षात आले आहे. दुष्काळाचे नाव पुढे करून नीरा-बारामती रोडवरील कारखान्याच्या मतदारांना साद घालण्याचा हा पॅटर्न सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे