गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
वडगाव निंबाळकर : भरदिवसा शाळकरी अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून विनयभंग; टवाळखोरांच्या दहशतीने नागरिक त्रस्त, मुख्य आरोपी गजाआड

0
7
5
4
4
2
बारामती : वडगाव निंबाळकर परिसरामध्ये सध्या टवाळखोर आणि गुन्हेगारांनी मोठी दहशत माजवली असून, शाळकरी मुलींना रस्त्यावरून निर्भयपणे चालणेही मुश्कील झाले आहे. दत्तनगर, चिलाईमाता मंदिर रोड परिसरात भरदिवसा अल्पवयीन शाळकरी मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करून विनयभंग केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात या रोडरोमिओंची किती मोठी दहशत आहे, हे उघड झाले असून पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २९ जून २०२६ रोजी दुपारी ४:४० वाजताच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची मैत्रीण शाळा सुटल्यानंतर पायी घरी परतत होत्या. यावेळी परिसरामध्ये आपलीच दहशत असल्याच्या गुर्मीत आर्यन सचिन माने व त्याच्या साथीदाराने त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून या मुलींचा पाठलाग सुरू केला. भररस्त्यात या आरोपींनी या शाळकरी मुलींच्या आजूबाजूला दुचाकीवरून तब्बल तीन वेळा चकरा मारल्या. तिसऱ्या खेपेला त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी आर्यन सचिन माने याने पीडितेच्या अंगाला स्पर्श करून तिचा आणि तिच्या मैत्रिणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत भयंकर कृत्य केले. या सराईत गुन्हेगारी वृत्तीच्या कृत्यामुळे या परिसरात मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संतापजनक प्रकारानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५, ७८, ३ (५) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम कलम ८ व १२ या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यातील आर्यन सचिन माने (रा. निरगुडवाडी सदोबाचीवाडी, ता. बारामती) याला पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याचा साथीदार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांची ही वाढती दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस आता कोणती कडक पावले उचलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार हृदयनाथ देवकर यांनी काम पाहिले आहे. या गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट विशेष न्यायालय बारामती यांच्या कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



