अभिव्यक्तीराजकियविशेष लेखसंपादकीय
ती सावरली नाही, ती उभारली… महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा प्रेरणादायी प्रवास, सुनेत्रावहिनी अजित पवार: एक संयमी आणि प्रेरणादायी नेतृत्व

0
5
9
3
8
7
आयुष्यात संकटे कोणाला चुकली आहेत? वादळे येतात, तेव्हा मोठमोठे वृक्षही उन्मळून पडतात. अशा वेळी सामान्य माणसं कोलमडतात, काही सावरतात; पण काही दुर्मिळ व्यक्तिमत्त्व अशी असतात जी केवळ सावरत नाहीत, तर त्या राखेतून पुन्हा नव्याने आणि अधिक ताकदीने ‘उभारतात’. सुनेत्रा अजित पवार, अर्थात आपल्या सर्वांच्या ‘सुनेत्रावहिनी’ या याच व्याख्येत बसणाऱ्या एक संवेदनशील तरीही कणखर व्यक्तिमत्त्व आहेत.
’पवार’ हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात हिमालयासारखं मोठं आहे. अजितदादांसारख्या झंझावाती व धडाडीच्या आणि स्पष्टवक्त्या नेत्याच्या पत्नी म्हणून वावरताना, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवणं हे सोपं नसतं. पण सुनेत्रावहिनींनी ते लिलया पेललं. त्या कधीच फक्त ‘अजितदादांच्या पत्नी’ म्हणून मिरवल्या नाहीत. त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं—तेही राजकारणाच्या गदारोळापासून दूर, समाजसेवेच्या आणि पर्यावरणाच्या शांत पण ठाम कामातून.

मध्यंतरीचा काळ त्यांच्यासाठी, पवार कुटुंबासाठी आणि बारामतीसाठी अत्यंत कठीण होता. कौटुंबिक नातेसंबंध आणि राजकीय कर्तव्य यांच्यात झालेली ती रस्सीखेच मनाला वेदना देणारी होती. जेव्हा घरातलीच माणसं एकमेकांच्या विरोधात उभी राहतात, तेव्हा एका स्त्रीची होणारी घालमेल शब्दांत मांडणे कठीण असते. अशा वेळी कोणीही खचून गेलं असतं, कोलमडलं असतं. टीका झाली, आरोप झाले, निकालाचे वार झाले. पण सुनेत्रावहिनी डगमगल्या नाहीत. त्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या, त्या शांत राहिल्या, आणि त्यातूनच त्यांचं ‘उभारणं’ सुरू झालं.
”ती सावरली नाही, ती उभारली” हे वाक्य त्यांच्यासाठी का चपखल बसतं? कारण ‘सावरणे’ म्हणजे फक्त पडल्यानंतर पुन्हा उभे राहणे. पण ‘उभारणे’ म्हणजे त्या संघर्षाचा पाया करून त्यावर नव्याने निर्माण करणे. पराभव किंवा कठीण प्रसंग हे पूर्णविराम नसतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं.
वादळ आले की भल्याभल्यांचे पाय डगमगतात. होत्याचे नव्हते होते. पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात, जी राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतात. महाराष्ट्राने नुकताच असाच एक वज्राघात अनुभवला. राज्याचे लाडके नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक आणि अपघाती निधनाने सह्याद्रीचा कडा कोलमडला. बारामती पोरकी झाली, पक्ष हवालदिल झाला आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा वेळी सर्व सामान्य अपेक्षा होती की, अजितदादांची अर्धांगिनी कोलमडून पडेल. पण, नियतीला आणि महाराष्ट्राला वेगळंच काही पाहायचं होतं. शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये जेव्हा सुनेत्रा अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा महाराष्ट्राने पाहिले की— त्या केवळ सावरल्या नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने उभारल्या आहेत!

दुःखाच्या लाटेवर कर्तव्याचा सेतू
अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे. एकीकडे आयुष्यभराचा जोडीदार गमावल्याचे आभाळएवढे दुःख आणि दुसरीकडे राज्याची, पक्षाची आणि लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी. अशा द्विधा मनस्थितीत सुनेत्रावहिनींनी स्वतःच्या अश्रुंना बांध घालत, जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा निर्णय घेतला. “कुटुंबापेक्षा जनता श्रेष्ठ” हा अजितदादांचा विचार प्रमाण मानून, त्यांनी अत्यंत साधेपणाने, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ स्वीकारली. या क्षणी त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. हा क्षण केवळ एका पदाचा नव्हता, तर एका कणखर स्त्रीशक्तीचा उदय होता.
वारसा संघर्षाचा आणि सेवेचा
सुनेत्रावहिनींचा हा प्रवास एका रात्रीत घडलेला चमत्कार नाही. १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशीव जिल्ह्यातील तेर येथे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय घराण्यात त्यांचा जन्म झाला. १९८५ मध्ये अजितदादांशी विवाह झाल्यानंतर त्यांनी कधीच केवळ ‘गृहिणी’ किंवा ‘नेत्याची पत्नी’ म्हणून स्वतःला सीमित ठेवले नाही. मुले मोठी झाल्यानंतर त्या पूर्ण ताकदीने समाजकारणात उतरल्या.
गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ त्या ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून पर्यावरण, जलसंधारण आणि ग्रामविकासाचे काम करत आहेत. काटेवाडीसारख्या गावाला राष्ट्रपतींच्या दखलपात्र पातळीवर नेऊन ‘निर्मल ग्राम’ करण्याचे श्रेय त्यांच्याच दूरदृष्टीला जाते. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी ३००० हून अधिक महिलांच्या हाताला काम दिले. “महिलांचे आर्थिक स्वावलंबन” हे केवळ भाषण नसून कृती असावी, हे त्यांनी २७ हून अधिक कंपन्यांच्या माध्यमातून सिद्ध केले.
संसदेपासून मंत्रालयापर्यंत
केवळ सामाजिक कार्यच नव्हे, तर २५ जून २०२४ पासून राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले आहे. मेक्सिको येथील महिला खासदार परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी मांडलेली भूमिका असो, किंवा केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीमधील त्यांचे काम असो; त्यांच्या कामात एक प्रशासकीय पकड नेहमीच दिसून आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य ते ‘मार्ट’च्या संस्थापक अध्यक्ष असा त्यांचा व्याप मोठा आहे.

दादांचे स्वप्न, वहिनींचा ध्यास
शपथविधीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सुनेत्रावहिनी म्हणाल्या, “दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षाची ताकद हाच माझा आधार आहे. न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवणे हे दादांचे स्वप्न होते, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठा ठेवून, अजितदादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. बारामतीकरांना अजितदादांची कमतरता भासू नये, आणि राज्याचा विकास थांबू नये, यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.





