गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
माळेगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा; विद्यार्थिनींला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

0
5
4
4
2
6
बारामती (प्रतिनिधी): शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथील ‘शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या’ डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उघडकीस आली आहे. वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवून, त्यांचा विनयभंग करून ‘इंटर्नलचे ३० मार्क माझ्या हातात आहेत’ अशी धमकी देणाऱ्या नराधम प्राध्यापकावर माळेगाव पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन शंकर तावरे (रा. सांगवी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी कॉलेजचे प्राचार्य संदीप रमेश शहा (वय ५३) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन तावरे हा शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच्या वर्गावर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २२ जानेवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्याने आपल्या पदाचा गैरवापर करत वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले.
आरोपीने विद्यार्थिनींची इच्छा नसतानाही त्यांना व्हॉट्सॲपवर लैंगिक उद्देशाने अत्यंत अश्लील भाषेत मेसेज पाठवले. जेव्हा विद्यार्थिनींनी या मेसेजेसला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा “इंटरनलचे ३० मार्क माझ्या हातात आहेत, बघून घेईन” अशी धमकी देऊन त्याने त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला.

केवळ मेसेजवरच न थांबता, आरोपी तावरे हा वर्गात शिकवत असताना देखील विद्यार्थिनींना लैंगिक उद्देशाने स्पर्श करणे, त्यांच्या जवळ जाणे असे अश्लील चाळे करत असे. एखाद्या विद्यार्थिनीने या कृत्याला विरोध दर्शविल्यास तिला टार्गेट करून वर्गात तिचा अपमान केला जात असे व पुन्हा मार्कांचे आमिष दाखवून किंवा भीती घालून तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात होता.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळेगाव पोलिसांनी आरोपी नितीन तावरे याच्याविरुद्ध BNS ७४, ७५, ७८, ७९ आणि पोक्सो कलम ९F, १०, १२ प्रमाणे गुन्हा (गु. र. नं. ४०/२०२६) दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे हे करत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, अशा विकृत मानसिकतेच्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.






