Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिरूरमध्ये मध्यरात्रीचा ‘ड्रग्स’ थरार! दिवसा गॅरेज काम, रात्री ‘एमडी’ची विक्री; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त

0 5 9 3 8 7

शिरूर : दिवसा हाताला ऑईल लावून गाड्या दुरुस्त करणारा एक ४१ वर्षीय गॅरेज चालक रात्रीच्या अंधारात मात्र तरुणाईला बरबाद करणारी ‘पांढरी नशा’ विकत असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १८ जानेवारीच्या मध्यरात्री टाकलेल्या एका मोठ्या छाप्यात तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स जप्त केले असून, या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांनी जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’ राबवण्याचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पथक अवैध धंद्यांवर नजर ठेवून होते.

रविवारी (दि. १७) गस्त घालत असताना पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून धक्कादायक माहिती मिळाली. शिरूर शहरातील शादाब रियाज शेख हा गॅरेज चालक बाबुरावर नगर परिसरातील मोकळ्या मैदानात ड्रग्स विक्रीसाठी येणार आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला. रात्रीचे १२ वाजून १० मिनिटे झाली होती. बाबुरावर नगरच्या त्या निर्जन मैदानात एक ‘होंडा पॅशन’ बाईक आली. अंधारात काही हालचाली टिपताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने संशयिताला घेरले आणि त्याला जागीच पकडले.

पोलिसांनी आरोपी शादाब रियाज शेख (वय ४१, रा. डंबेनाला, शिरूर) याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात तब्बल १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रोन’ (MD) नावाचा अत्यंत महागडा अंमली पदार्थ मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत प्रचंड असून, पोलिसांनी बाईकसह एकूण २,१०,७०,०००/- (दोन कोटी दहा लाख सत्तर हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, शिरूर पोलीस ठाण्यात आरोपी शादाब शेख याच्या विरोधात एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८ (क) आणि २१ (क) अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे