आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बारामती शहर पोलिसांची शाळांमध्ये थेट भेट ‘शक्ती बॉक्स’मधील तक्रारींची घेतली दखल

0
8
7
4
3
9
बारामती : बारामती शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बारामती शहर पोलिसांनी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जळोची येथील शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन पोलिसांनी ‘शक्ती बॉक्स’मधील (तक्रार पेटी) तक्रारींची दखल घेतली. तसेच विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती आणि बाल सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशान्वये ही मोहीम राबविण्यात येत आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने जळोची येथील कवी मोरोपंत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूलला भेट दिली.
या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थी तक्रार पेटी उघडून त्यातील प्राप्त तक्रारींची पाहणी करण्यात आली. काही किरकोळ तक्रारींची संवेदनशीलतेने दखल घेत, संबंधित विद्यार्थ्यांची ओळख व गोपनीयता राखून मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शिक्षा करण्याऐवजी, त्यांच्या वर्तनाचे दुष्परिणाम समजावून सांगून योग्य ती समज आणि मार्गदर्शन देण्यात आले.

पोलीस महासंचालकांच्या ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ या संकल्पनेनुसार आणि राज्य शासनाच्या 27 सप्टेंबर 2024 च्या विद्यार्थी सुरक्षा धोरणाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना घ्यायची काळजी, सोशल मीडिया व मोबाईलचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक आणि सायबर बुलिंगपासून संरक्षण, छेडछाड, व्यसनाधीनतेपासून दूर राहणे आणि वाहतूक नियमांचे पालन याविषयी पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. शरीराच्या सुरक्षिततेविषयी जागरूक करत, कोणतीही संशयास्पद किंवा अस्वस्थ करणारी घटना लपवून न ठेवता त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांना सांगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




