Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

बारामतीत पोलिसांचा ‘ऑल आऊट’ दणका ६५ वॉरंट आणि ७० फरार असे १३५ आरोपी जेरबंद गुन्हे दाखल होऊनही राजरोसपणे फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

1 0 2 9 3 4

बारामती :  ​गुन्हे दाखल होऊनही राजरोसपणे फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवत अवघ्या काही दिवसांत तब्बल १३५ आरोपींना जेरबंद केले आहे. यामध्ये पकड वॉरंटमधील ६५ आणि विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या ७० फरार आरोपींचा समावेश असून, या सर्व आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे बारामती शहर आणि परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांनी पोलिसांचा चांगलाच धसका घेतला आहे.

​परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनिषा ओमासे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून प्रलंबित गुन्हे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. यासाठी विशेष पथकाची स्थापना करून पकड वॉरंटमधील आणि फरार आरोपींची संपूर्ण कुंडली तयार करण्यात आली. आरोपी नेमके केव्हा हाती लागू शकतात याचा अचूक अंदाज घेत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे भल्या पहाटे आरोपींच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत पकड वॉरंटमधील ६५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. या दणक्यामुळे उर्वरित वॉरंटमधील आरोपी स्वतःहून न्यायालयात हजर राहू लागले आहेत. बारामती शहर पोलिसांकडून पकड वॉरंट आणि न्यायालयाच्या समन्सची शंभर टक्के बजावणी होत असल्याने प्रलंबित खटले निकाली निघण्यास मोठी मदत झाली असून न्यायालयानेही पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

​यासोबतच बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील एकूण २३० आरोपी बऱ्याच कालावधीपासून फरार होते आणि उजळ माथ्याने वावरत होते. पोलिसांनी या पाहिजे असलेल्या आरोपींची सखोल माहिती संकलित करून सापळा रचला आणि त्यातील ७० फरार आरोपींना बेड्या ठोकल्या. कायदेशीर कारवाईनंतर या सर्वांना न्यायालयामार्फत येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमधून बारामती पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनिषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई तुषार शिंदे, चालक ऋषीकेश जाधव, आरटीपीसी अक्षय कोळेकर आणि सरोदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे