
सोमेश्वरनगर : वाघळवाडी-सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मुगुट महोत्सव २०२६’ चे दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत हा महोत्सव पार पडणार असून, यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

महोत्सवाची सुरुवात मंगळवार, दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटनाने झाली. या पहिल्या दिवशी ‘आनंदमेळा’, ‘मिसमॅच डे’, आणि ‘खाऊ गल्ली’ मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष आकर्षण म्हणून ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी हजेरी लावली. दुपारी महाविद्यालयीनस्तरीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे, सुमित गुणवंत यांच्या उपस्थितीत ‘काव्य मैफिल’ रंगली.
बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजीतभैय्या काकडे-देशमुख यांच्या हस्ते ‘फूड अँड फन फेस्टिव्हल’चे उद्घाटन होणार आहे. या दिवशी साडी डे, टाय डे आणि ट्रॅडिशनल डे (पारंपरिक वेशभूषा) साजरा केला जाणार असून महाविद्यालयाच्या परिसरात विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे.
गुरुवार, दि. १५ जानेवारी हा महोत्सवाचा मुख्य दिवस ठरणार आहे. सकाळी ९.३० वाजता लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी पोवाडा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता प्रमुख पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु. सा. काकडे महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. सतीशभैय्या काकडे-देशमुख असतील. तसेच उद्योजक आर. एन. (बापू) शिंदे, अभिजीतभैय्या काकडे आणि सचिव सतीश लकडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुपारी ‘शेला पागोटे’ आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
महोत्सवाची सांगता शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ९.३० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मा. सिमरन खेडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यानंतर खाऊगल्ली आणि समारोपाने महोत्सवाची सांगता होईल.
सदरचे सर्व कार्यक्रम माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृहात पार पडणार आहेत. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन मुगुट महोत्सव प्रमुख प्रा. डॉ. गेणू दरेकर आणि प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा