Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मोक्कातील आरोपीची भरधाव कारवर हुल्लडबाजी, भररस्त्यात स्टंटबाजी कराल तर थेट जेलमध्ये जाल!  दहशत पसरवणाऱ्या प्रवृत्तींना बारामती पोलिसांचा कडक इशारा.

बारामतीत रस्त्यावर चारचाकी वाहनावर बसून दहशत व स्टंटबाजी करत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या बारामती शहर पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

0 8 8 1 0 8

बारामती : शहरात दहशत माजवण्याचा किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास बारामती पोलीस कोणतीही गय करणार नाहीत, असा सज्जड दम बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. भरधाव वाहनातून धोकादायक स्टंटबाजी करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. असल्या विकृती मोडून काढण्यासाठी बारामती पोलीस पूर्णपणे सक्षम असल्याचा स्पष्ट संदेश या धडक कारवाईतून देण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास इंदापूर चौक परिसरात एक चारचाकी वाहन (एम.एच. ४२ बी.एन. १०९५) अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे चालवले जात होते. या वाहनाच्या टपावर बसून आणि खिडकीतून शरीर बाहेर काढून काही तरुण नागरिकांकडे हातवारे करत होते.

त्यांच्या या हुल्लडबाजीमुळे इतर वाहनांना धोका निर्माण झाला, रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ आणि मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमांन्वये (गु.र.नं. ३६६/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून,योगेश बापू लोंढे, किशोर संजय ढोरे उर्फ मोठा डावर आणि एका अनोळखी व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर ढोरे याच्यावर यापूर्वीही मारामारी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असून तो मोक्का (MCOCA) प्रकरणातून जामिनावर बाहेर आहे. सार्वजनिक शांतता भंग करून जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे अहवाल सादर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा धाक दाखवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे किंवा टोळीच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बारामतीत खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

अशा प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) आणि मोक्का (MCOCA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही गुन्हेगाराकडून धमकी, खंडणी, मारहाण किंवा त्रास दिला जात असल्यास नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता थेट डायल ११२ वर किंवा बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. नागरिकांनी निर्भय राहावे, पोलीस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी तसेच तपास पथकातील उपनिरीक्षक सर्जेराव पाटील, हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, मनोज अनुभुले आणि महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे