
तथागत गौतमबुद्ध कोण होते हे खरे तर जगाला सांगायची गरजच नाही, गरज आहे ती त्यांनी दिलेल्या विचारांवर विचार करून ती अंगीकृत करण्याची,
जीवनाचा खरा अर्थ शोधायला हवा म्हणून ज्यांनी राज्यत्याग केला असे
बुद्ध हे राजपुत्र होते. त्यांचे बालपण मोठ्या सुखात गेले. परंतु इतर माणसांना दु:खी पाहून त्यांना खूप दु:ख होत. हे दु:ख का निर्माण होते? ते नाहीसे कसे करता येईल? असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत. या प्रश्नांमुळे त्यांचे मन अस्वस्थ होत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला,
घरदार सोडून बराच काळ सुख, शांती आणि सत्याच्या शोधात फिरत राहिले. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी बसून त्यांनी घोर तपश्चर्या केली. बौद्धगया येथे बोधीवृक्षाच्या खाली समाधी लावून बसले असता त्यांना साक्षात्कार झाला.
हळूहळू लोक त्यांचे अनुयायी बनू लागले. सुरूवातीला सारनाथ आणि काशी येथे त्यांनी लोकांना उपदेश केला. बुद्धांची तत्वे ही पंचशील तत्वे म्हणून प्रसिद्ध आहेत.
याच साक्षात्कारातुन बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते. आणि दु:खमुक्तीचा मार्ग सापडला. तोच त्यांनी लोकांना सांगितला. याच मार्गाचा याच विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी एका धर्माची स्थापना केली. तो जगातील महान धर्म ‘बौद्ध धर्म’ होय.

जन्माने कोणीही उच्च वा नीच नसतो. तो त्याच्या विचार व कार्याने स्वतःचा दर्जा निर्माण करीत असतो. सुंदर वस्त्र, अलंकार, आभुषणे घालून व्यक्तीला ज्ञानी होता येत नाही. त्यासाठी योग्य शिक्षण, त्याच्यावर जाणीवपूर्वक झालेले चांगले संस्कार महत्त्वाचे असतात. हे संस्कार कशा पद्धतीने करावेत, हे तथागत बुद्धांनी सांगितले आहे. अशाच संस्कारांची एक आचरण पद्धती एक नियमावली तथागत बुद्धांनी सांगीतली आहे तीला पंचशील
म्हणून संबोधले जाते. पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत.याच पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. आणि बहुतेक जगातील सर्व बौद्ध पाचही शीलाचे पालन करतात.

पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे आहे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी’
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहेत. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.
तथागत बुद्धांनी सांगितलेले पंचशील कोणा एका समूह, जात अथवा धर्मासाठी नव्हे, तर सबंध मानवी समूहास कल्याणकारी आहे. याचे अनुसरण केले तर घर, समाज व देशात नक्कीच स्थैर्य, शांतता नांदेल. जगभरात सध्या मानवी हक्कासाठी चर्चा सुरू आहेत. परंतु हा विचार अडीच हजार वर्षांपूर्वी तथागतांनी पहिल्यांदा मांडला. आजही तो लागू पडतो.
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखमय असावे, यासाठी प्रयत्नशील असतो. सतत धडपडत असतो. ताण-तणाव विरहीत जीवन जगता यावे, यासाठी कायम काही ना काही करत असतो. आपल्याला सुखी जीवन जगता आले नाही, तर आपल्या मुलांना जगता यावे, म्हणून मेहनत, परिश्रम घेत असतो. महात्मा गौतम बुद्ध यांनी सुखमय जीवन जगण्यासाठी पाच गोष्टींचे आचरण कायम करावे, असे सांगितले आहे.
सुखी जीवन जगायचे असेल, तर पाच गोष्टी आवश्यक आहेत. अहिंसा, अचोर्य म्हणजे चोरी न करणे, इंद्रिय भोग विरक्ती, असत्य कथन न करणे आणि मदिरा म्हणजेच उत्तेजक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे. या पाच गोष्टींचे आचरण केल्यास आपण नेहमी सुखमय जीवन जगू शकाल, असे गौतम बुद्ध सांगतात. याच आचरणांना पंचशील म्हटले जाते.तथागत बुद्धांचे पंचशील मानवाच्या कल्याणासाठीच आहे.
भगवान गौतम बुद्धांनी दिलेला पंचशील उपदेश मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा आहे.
दुःखाचे मूळ शोधून मानवाला सद्मार्गाची शिकवण देण्याचे काम तथागतांनी केले आहे. तथागतांनी आपल्या साधनेतून जे ज्ञान प्राप्त केले, ते ज्ञान त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यांना सांगितले. तथागतांनी सांगितलेले ज्ञान हे आपण आपले जीवन जगण्यासाठी कशा प्रकारे व्यवहार करावा आणि कोणत्या स्वरूपाचा व्यवहार त्याग करावा यांचे दिशादर्शन करणारे आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, “मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे” तथागतांनी सांगितलेले ज्ञान हे प्रेम, करुणा, शील, अहिंसा यांचा अंगीकार करणारे आहे, तर द्वेष, वैरभाव, अहंकार, ईर्षा यांना नाकारणारे आहे. त्यांनी जातिभेद नाकारला. विशेषाधिकार नाकारले. स्वामी विवेकानंद तथागतांचे वर्णन करताना म्हणतात, “बुद्धदेवांना लावलेल्या अनेक विशेषणांपैकी मला आवडणारी सगळ्यात उत्कृष्ट विशेषणे म्हणजे ‘जातिभेदभंजक, ‘विशेषाधिकारनाशक आणि ‘सर्व प्राण्यांच्या समानतेचा उपदेशक ही होय. बुद्धांनी समतेच्या कल्पनेचा प्रचार केला होता.” तथागत बुद्धांनी बहुजनहिताय बहुजन सुखाय या तत्त्वाला आधार मानून आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले. तथागतांनी सांगितलेले ज्ञान किंवा उपदेश व्यक्तिगत जीवनातील व्यवहाराशी जोडलेले आहे. एका अर्थाने तथागतांनी आपल्या उपदेशातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य केले आहे. दुःखमुक्त जीवनासाठी त्यांनी पंचशील सांगितला. पंचशील म्हणजे काय? तर आपला जीवनव्यवहार कसा असावा याचे दिशादर्शन करणारे मार्गदर्शन सूत्र होय.
पंचशीलाबाबत एक गोष्ट अशी आहे की,
एकदा एक भिक्खु एका गांवावरुन दुसर्या गावाला जात असतांना रात्र होते.
म्हणून ते त्या गांवच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवा-याची व्यवस्था करायाला विनंती करतात.तेव्हा तो गृहस्थ आनंदीत होऊन भिक्खुंची राहण्याची व्यवस्था करतात.
सकाळी उठून भिक्खु त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामूळे तुझे कल्याण होईल असे सांगतात.
परंतू त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामूळे तो मनातल्या मनात विचार करतो की, हे शील पाळणे मला शक्य होणार नाही.
म्हणून जस-जसे भिक्खु एक-एक शील समजावून सांगतात तस-तसे तो गृहस्थ शीलाचे पालन करण्यास नकार देतो.
त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा आहे हे सुध्दा तो गृहस्थ भिक्खूला सांगू शकत नाही.
म्हणून भिक्खु म्हणतात की, पांचही शीले पाळता येत नसतील तर निदान चार शीले तरी पाळा.तो गृहस्थ त्यालाही नकार देतो.
तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान तीन शीले तरी पाळा.तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की,निदान दोन शीले तरी पाळा.तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की,निदान एक शील तरी पाळा.
गृहस्थाला वाटते की, एखादा शील तरी पाळायला काय हरकत आहे, म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, “मी खोटे बोलणार नाही, हे शील पाळायला तयार आहे.”
भिक्खु उपदेश करुन निघून जातात.
रात्रीला नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो. त्याचवेळेस त्या राज्याचा राजा सुध्दा वेशांतर करुन राजवाडयाच्या बाहेर येतो.
तेव्हा त्या राजाला तो गृहस्थ दिसतो.
त्या गृहस्थाला राजा विचारतो, “कोण आहेस ? काय करतो ?”
त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामूळे त्याने सांगितले,
“मी चोर आहे. राजाच्या तिजोरितील हिरे मला चोरायचे आहे.”तेव्हा त्या राजाला त्याच्या खरे बोलण्याबद्दल कौतूक वाटले.
राजाने त्याला सांगितले,
“ तू तर खरा बोललास. मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील. म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे. म्हणजे मी राजाला सांगणार नाही.”
या गोष्टीला तो चोर तयार झाला.
तो राजवाडयाच्या आंत जाऊन हिर्याचा शोध घेतो. तेव्हा त्याला असे दिसले की,
त्या तिजोरीत फक्त तिनच हिरे आहेत.
यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्तीला कसे देणार असा प्रश्न पडल्यामूळे तो एक हिरा तसाच ठेऊन दोन हिरे सोबत घेऊन राजवाडयाबाहेर पडतो.बाहेरच्या व्यक्तीला त्या दोन पैकी एक हिरा देतो.त्या व्यक्तीने विचारल्यामूळे पत्ता सांगून तो चोर निघून जातो.
दुसर्या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतात.तिजोरी पाहील्यानंतर प्रधानाला तिन पैकी फक्त दोन हिरे चोरीला गेल्याचे आढळते.
प्रधानाला वाटते की, चोराने तिन्हिही हिरे चोरले असते. राजाला कुठे माहिती आहे की,
एक हिरा चोराने तेथेच ठेऊन दोन हिरे घेऊन गेला.म्हणून तो एक हिरा स्वत:जवळ ठेवतो व राजाला सांगतो की, तिजोरितील तिनही हिरे चोरीला गेले आहेत.
राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा लक्षात आला.
त्याचवेळेस राजा दरबार भरवतो. हिरे चोरणार्या त्या चोराला राजा दरबारात बोलावीतो.
चोराच्या लक्षात येते की, रात्रीचा जो व्यक्ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामूळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार…
आपण भिक्खुमूळे फसल्या गेलो याचे त्याला दु:ख झाले.
राजाने प्रधानाने केलेल्या खोटेपणा बद्दल प्रधानाला काढून टाकले व चोराच्या ख-यापणाबद्दल त्या चोराला प्रधान बनविले.
राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले.
भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामूळे मला प्रधानपद मिळते.
मी जर पांचही शीलाचे पालन केले असते तर मी कुठल्या कुठे जाऊन पोहचलो असतो.
एवढी ताकद या पंचशीला मध्ये आहे याची त्याला जाणीव झाली…..!!!
खरचं पंचशिल ही प्रार्थना नाही तो शिलाचार आहे. माणूस बनण्याची गुरुकिल्ली आहे. तथागतांनी सांगितलेले पाच जगतश्रेष्ठ नियम आहेत.
१)मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. २)मी चोरी करणार नाही. ३)मी व्यभिचार किंवा परस्त्रीगमन करणार नाही. ४) मी खोटे बोलणार नाही. 5)मी दारू पिणार नाही; हेच बौद्धांचे पंचशील, सदाचाराचे पाच नियम आहेत .बुद्ध धम्मप्रवेश करताना हीच शपथ सर्वप्रथम घ्यावी लागते.
हि शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील (सदाचाराचे पाच नियम) होय. याचा आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात योग्य तसा वापर करून कोणताही मनुष्य मग तो कोणत्याही धर्माचा असो तो एक आदर्श जीवनाचा मार्ग ठरू शकतो.

नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय
भवतु सब्ब मंगलम्
लेखन: सुशीलकुमार विलास अडागळे
मुख्य संपादक : महाराष्ट्र पोलीस कारनामा
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा