बारामती : रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याच अनुषंगाने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर, हार्वेस्टर या वाहनांना रिफ्लेक्टर व परावर्तीत पडदे वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दि. १७ रोजी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,सोमेश्वर येथे संपन्न झाला.

या वेळी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक, बजरंग कोरवले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, प्रियांका सस्ते, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, हेमलता तावरे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कामथे व संचालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना बारामती उपप्रादेशिक परविहन कार्यालयाचे निरीक्षक बजरंग कोरवले यांच्यावतीने उपस्थित वाहन चालक आणि वाहन मालक यांना काही मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या प्रामुख्याने दिवसा किंवा रात्री ऊस वाहतूक करत असताना वाहनांवर कर्कश व मोठ्या आवाजात गाणी लावून ऊस वाहतूक करु नये.

असे केल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनाने दिलेले संकेत हे ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाच्या लक्षात येत नाहीत व परिणामी अपघात होण्याची शक्यता असते.
तसेच आपल्या वाहनांना जे रिफ्लेक्टर देण्यात आलेले आहेत ते लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. याचबरोबर दिवसा किंवा रात्री मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे काही निदर्शनास आल्यास त्या वाहनचालकावर तसेच मालकावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल व तसेच इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

हा कार्यक्रम बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला होता.
याप्रसंगी कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, संचालक लक्ष्मण गोफणे, किसन तांबे,रणजीत मोरे, संग्राम सोरटे, जितेंद्र निगडे, तुषार माहुरकर,आणि कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी बापुराव गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकी अधिकारी सतिश काकडे यांनी केले व केनयार्डचे सुपरवायझर योगेश पाटील यांनी आभार मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा