Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगविशेष लेख

एकदा तरी पहावी अशी मायानगरी दुबई! 

0 1 4 5 6 9

विशेष लेख..

मागील महिन्यातच आठ दिवस दुबई व अबू धाबी, शारजाह इथे टूर कंपनीच्या माध्यमातून सपत्नीक सहलीचा योग आला.

 

दुबईचा इतिहास तसा विस्तृत आहे. दुबई पूर्वी हे एक लहान मासेमारी गाव होते असे म्हटले जाते,जे पारशी व्यापाऱ्यांनी १९ व्या शतकात व्यापारासाठी महत्त्वपुर्ण होते. त्यानंतर, दुबईची झपाट्याने वाढ झाली आणि एक प्रमुख व्यापार आणि पर्यटन केंद्र म्हणून त्याची स्थापना झाली.

दुबई ही संयुक्त अरब अमिरातीची राजधानी आहे आणि व्यवसाय, पर्यटन आणि भव्यतेचे एक विस्तृत केंद्र आहे. प्रगत पायाभूत सुविधा, उच्च राहणीमान आणि व्यावसायिक क्रियाकलाप असलेला हा प्रांत आहे.

अरबी समुद्राजवळील दुबईचे स्थान इतिहासात महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. १९६६ मध्ये तेल आणि वायूचा शोध लागल्यानंतर दुबईची अर्थव्यवस्था आणखी वाढली. आज दुबई इथे मुस्लिम राजेशाही आजही अस्तित्वात आहे.

सध्याचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांनी इथे केलेली अभूतपूर्व अशी सुधारणा, कायम ठेवलेला कायद्याचा धाक वाखाणण्याजोगा असाच आहे.

मुळात आपल्याकडे जसे शीख लोकांवर विनोद केले जातात तसेच काही वर्षांपूर्वी अरब शेख लोकांना मंद किंवा कमी हुशार समजले जायचे.

अरब वाळवंटात पाण्याच्या दुर्भिक्ष आल्यामुळे छोट्या मोठ्या टोळ्या पाण्यासाठी एकमेकांशी भांडत असायच्या.

त्यातून निर्वासित होऊन मकतुम हे प्रभावशाली कुटुंब/ टोळी दुबई भागात शेकडो वर्षापासून स्थाईक झाली.

इथे भारता प्रमाणेच ब्रिटिश राजाने अनेक वर्षे राज्य केले. दुबई बंदरात प्रवासी जहाजे थांबा म्हणून वापर करायची. तेवढेच याचे महत्त्व होते.

मजूर म्हणून येथील स्थानिक अरब काम करायचे. येथील समुद्र उथळ असल्यामुळे पुढे काही वर्षांनी नैसर्गिक मोती ची शेती अरबी लोकांनी सुरू केली. येथील मोती जगात पाठवणे सुरू केले. परंतु जपान मध्ये मानवनिर्मित मोती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याची विक्री जगभरात वाढल्यामुळे अरब लोकांचा धंदा बंद पडला. पण पुढे नैसर्गिक तेलाचे साठे या ठिकाणी सापडले.

शेख मोहम्मद यांचे वडील शेख रशीद यांनी त्यांचे ब्रिटिश शाही दरबारात स्वतःचे वजन वाढवले. लंडन मध्ये राहून त्यांनी व्यापारी लोकांकडून व्यापाराचा अनुभव घेतला. त्यांना समजून चुकले की आपल्या देशातील तेलाचे साठे  काही वर्षांतच संपून जाणार आहेत. व आपल्या देशाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडे असे काहीतरी हवे की ज्यामुळे आपला देश कायम रहावा व आपला देश पहाण्यासाठी लोक देश परदेशातून आपल्याकडे येतील स्थाईक होतील तसेच त्यामुळे देशाचा पर्यटन विकास होईल व आपल्या देशाचे अस्तित्व टिकून राहील देश टिकून राहील.यासाठी त्यांनी तेव्हापासून आजपर्यंत बेमाप दौलत खर्च करून  जगातील अद्वितीय, जगभरातील लोकांना आकर्षक वाटतील अशा बर्‍याच गोष्टींची निर्मिती केली.

त्यात प्रामुख्याने

फ्युचर  म्युझियम,

ग्लोबल व्हिलेज (इथे जगातील सर्व देशांच्या प्रसिद्ध अशा वस्तु खरेदी करू शकतो )

बुर्ज खलिफा (जगातील सर्वात उंच इमारत),

 

पाम बीच (जगातील एकमेव मानवनिर्मित बीच )

अंडर वॉटर टेनिस कोर्ट,

वर्ल्ड्स बिगेस्ट दुबई मॉल(पूर्ण फिरायला चार दिवस लागतात)

बुर्ज अल अरब (जगातील एकमेव सेवेन स्टार हॉटेल),

जेडब्ल्यू मॅरियट्स (जगातील सर्वात उंच 5 स्टार हॉटेल)

दुबई फ्रेम

दुबई म्युझियम

अशी एकाहून एक सरस पर्यटन स्थळ विकसित केली व आजपर्यंत ही पर्यटन स्थळ जगभरातील लोकांना आकर्षित करीत आहेत. जी पर्यटन स्थळ पाहण्यासाठी देश विदेशातील लोक दुबई कडे आपली पावलं घेऊन जातात व दुबईच्या विकासात आपला प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष हातभार लावतात.

देशाचे अस्तित्व, देशाची महानता, देशाचे सौंदर्य व देशाचा अभिमान तसेच स्वदेशाची दुसऱ्या देशांमध्ये असणारी व कायम रहाणारी भावना कायम ठेवण्यासाठी देश कायम प्रगतशील रहावा यासाठी व देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी याठिकाणी अत्यंत कठोर असे कायदे बनवले आहेत अगदी छोटे छोटे नियम व कायदे तयार करून देशातील तसेच परदेशातील नागरिकांना एक सुरक्षेची भावना तयार करून दिली आहे यामध्ये रस्त्यावर थुंकता येणार नाही,आपली स्वतःची कार अस्वच्छ ठेवता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकता येणार नाही. पाळीव प्राणी पाळण्याबाबत काही विशिष्ट नियम घालून दिलेले आहेत. नियमनचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो.दुबई दंडातून मोठ्या प्रमाणात पैसे कमविते.

दुबईतले कायदे खूप कठोर आहेत आणि दंडाची रक्कमही खूप मोठी आहे. त्यामुळे इथे सहजासहजी नियम व कायदे कोणीही तोडताना दिसत नाहीत.

मला इथे आठ दिवसात कुठेही ट्रॅफिक पोलीस दिसला नाही की कुठे मोठ्याने हॉर्न वाजवत असणार्‍या गाड्या दिसल्या नाहीत. विनाकारण जास्त वेळ गाड्या चौकात थांबविली की गाडी मालकाच्या बँक खात्यातून दंडाची रक्कम काढून घेतली जाते.

इथे बहुतेक सर्व लोक सार्वजनिक वाहतुकीसाठी जमिनी खालील रेल्वे मार्गाचा वापर करतात. त्यामुळे बस स्थानके प्रवासी लोकांची गर्दी सहसा दिसत नाही.

मोटार सायकल फक्त पिझ्झा, कुरिअर करणारे लोक वापरतात असे दिसते.

दुबई येथे टॅक्स नसल्यामुळे गोल्ड सुख मार्केट मध्ये मनसोक्त सोने खरेदी करता येते.गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंदलेली सर्वात मोठी ६४ किलोची सोन्याची अंगठी इथे आम्हाला पाहायला मिळाली.

प्रसिद्ध आय फोन (ठराविक मॉडेल्स), टॅबलेट इथे तीस ते चाळीस हजाराने स्वस्त मिळतात.

डेझर्ट सफारी चा जबरदस्त असा अनुभव तर शब्दात सांगू शकत नाही. रात्री वाळवंटातील ट्रॅडीशनल डान्स, जेवण तर केवळ अप्रतिम असेच आहे.

राजे शेख मोहम्मद यांचा जबिल पॅलेस परिसर, त्यांची लॅमोझिन गाडीची राईड जबरदस्तच आहेत. त्याचबरोबर मानवनिर्मित असा पाम जुमेरा बीचची आपण तर कल्पना हि करू शकत नाही असे अप्रतिम आहे. डाऊ क्रुज मधून रात्रीचा नजारा तर नेत्रदीपक आहे.

दुबईमध्ये वाहतुकीसाठी विशेष नियम व विशेष कायदे आहेत जर एखादा मोटार अपघात झाला तर पाच मिनिटात पोलीस तिथे येतात. दोघांचे म्हणणे ऐकून कुणाची चूक आहे याची खात्री करून दंड वसूल करतात व मेमो देऊन गाड्या दुरुस्तीला पाठवतात.

फौजदारी गुन्हा, चार्ज शीट, साक्षीदार अशा फंदात ही पोलीस यंत्रणा पडत नाहीत.मोठा गंभीर गुन्हा केला तर वेगळा तपास केला जातो.स्त्रीच्या संमती शिवाय तिचा फोटो कुणाला काढता येत नाही व काढलास तर तो एक गंभीर गुन्हा मानले जाते.

आमच्यासमोर चारच दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत पाकिस्तान आणि भारतातील दोन‌‌ वाहनांमध्ये पार्किंग च्या करण्यावरून भांडणे झाली होती. तेथील पोलिसांनी चौकशी केली असता पाकिस्तानी नागरिकाची चूक सापडल्याचे लक्षात आले व त्याला लगोलग दुबई मधून पाकिस्तान इथे पाठवून दिले. अशी येथील कायद्याची अंमलबजावणी राहते.

दुबई मध्ये भिकारी लोक कुठेच दिसत नाही किंबहुना नाहितच. पाकिस्तान येथून आलेल्या अशाच एका भीक मागणार्‍या टोळीला तेथील सरकारने त्यांच्या देशात तात्काळ माघारी पाठवून हाकलून दिले होते असेही ऐकण्यात आहे.

देशाचे नाव खराब करणारे लोक इथे खपवून घेतले जात नाहीत.इथे मोर्चे,आंदोलन, उपोषण करायचे धाडस कुणी दाखवत नाही.

इथे भारतातील सिनेसृष्टी कलाकार, उद्योगपती यांचे खाजगी मालकीचे बीचेस आहेत. यात शाहरुख खान, सलमान, अनिल कपूर ,ऐश्वर्या राय, विवेक ओबेरॉय, अंबानी, दक्षिणेतील सुपर स्टार मोहनलाल अशा मोठ्या व नामांकित व्यक्तिमत्त्वांची नावे आहेत.

दुबईने गोल्डन व्हिसा स्वतःहून काही कलाकारांना दिलेला आहे त्यात रजनीकांत, संजय दत्त, शाहरुख खान, आलू अर्जुन, मामुटी असे कलाकार आहेत.

२०३० पर्यंत थ्री डी  प्रिंटिंगद्वारे २५% इमारती बनविण्याची त्यांची योजना आहे. त्यांच्याकडे प्रवासी ड्रोनसारखे तंत्रज्ञान आहे, त्यांनी जगातील सर्वात स्मार्ट कनेक्ट शहर विकसित केले आहे. ते आता एक हायपरलूप तयार करत आहेत ज्याद्वारे दहा हजार प्रवासी अबूधाबी ते दुबईला १५ मिनिटांत प्रवास करू शकतात.

त्यांनी अतिशय उत्तम जल व्यवस्थापन संसाधने बनविली आहेत ज्यामुळे एका वाळवंटाचे गगनचुंबी इमारतींच्या शहरात रूपांतरण झाले आहे. दुबईतील बांधकाम इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जगातील २५% क्रेन एकट्या दुबईमध्ये कार्यरत आहेत.

दुबई चे राजे शेख मोहम्मद यांचे म्हणणे आहे की दर पाच वर्षांनी इथे येणार्‍याला दुबई वेगळी दिसली पाहिजे. त्यात अजून एक भर म्हणून दुबई मध्ये मानवनिर्मित चंद्राची निर्मिती सुरू होणार आहे.

तसेच बुर्ज खलिफा च्या सभोवताली खूप उंचावर लोकांना फिरायला स्काय वॉक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ते दुबई दोन हजार किलोमीटर अंतर पाण्याखालून हाय स्पीड ट्रेन द्वारे पूर्ण करायचा या दोन्ही देशाचा करार झाला आहे.

मुस्लिम राजेशाही असूनही इथे हिंदू  लोकांना धार्मिक सण साजरे करायला अजिबात आडकाठी नाही. इथे सुमारे दोन लाख हिंदू लोक कामानिमित्त राहत आहेत. इथे शिव मंदिर आणि कृष्ण मंदिर बांधलेली आहेत. दिवाळी, गणेश जयंती उत्सव, राम नवमी या सारखे उत्सव साजरे करायला स्वातंत्र्य दिले गेले आहे.

शिवाय सर्वात श्रीमंत अमिराती (Emirates) असलेले अबू धाबी येथील राजाने २७ एकर जमीन हिंदू मंदिर साठी दान दिलेले आहे.

नुकतेच भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी १४/०२/२०२४ रोजी या मंदिराचे उद्घाटन केले आहे.ही मंदिरे हि आम्हाला पाहण्याची संधी मिळाली हे विशेष.

दुबई प्रमाणेच भारतातील राजे व राजघराण्यातील प्रतिनिधींनी तसेच भारतातील शासन कर्त्यांनी आणि जनतेने मनात आणले तर भारत पण दुबई पेक्षा श्रीमंत होऊ शकतो.

दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर जपान आणि जर्मनी हे देश पूर्णपणे संपले होते. आज मात्र ते जगातील सर्वोत्तम देश आहेत. आपण निर्णय घेतल्यास, प्रयत्न केल्यास देशातील अंतर्गत कलह कमी करून ‘राष्ट्र सर्वोपरी’‌ असे मानून कार्य केल्यास आपला भारत देशही सर्व देशांपेक्षा अधिक चांगला घडवू शकतो.

आखाती व पूर्वेकडील देशांसारखा आपला भारत देशही येणाऱ्या काळात प्रगत व आधुनिक भारत म्हणून पहायला मिळावा,आपल्या देशाचेही इतर देशांनी गुणगान करावे, देशाची प्रशंसा करावी, देशाविषयी माहिती घ्यावी, देशाच्या इतिहासाची माहिती घ्यावी, देशातील संशोधनाची माहिती घ्यावी व देशातील संशोधनाचा वापर इतर देशांनी करावा असा आपला प्राचीन आणि आधुनिक भारत यांचा संगम येणाऱ्या काळात पाहायला मिळावा हीच अपेक्षा.

लेखक: ॲड विशाल बर्गे,बारामती

संपर्क: 8669174416

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे