महायुतीचं सरकार निवडून आल्यास सर्वच योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवार.
गडहिंग्लज तालुक्यातील चंदगड येथे आयोजित जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संवाद

गडहिंग्लज: तालुक्यातील चंदगड येथे आयोजित जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.
मी गेली ३५ वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं, सर्वधर्मसमभाव हीच आमची विचारसरणी आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील यांनी उल्लेखनीय अशी विकासकामं केली आहेत.
या कार्यक्रमाला माझ्या बहिणींनी दाखवलेली उपस्थिती आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हसू माझ्यासाठी आनंददायी आहे. आम्ही ज्या योजना सुरू केल्या, त्या पुढेही सुरूच राहणार. मी कामाचा माणूस आहे, काम करत राहणार.
माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं आणली आणि ती लोकप्रिय ठरली. माझ्या भगिनींना या योजनेचा मोठा लाभ झाला. भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले तसे, त्यांनी बाजारात खरेदी केली. याचा बाजारपेठेला सुद्धा फायदा झाला. याशिवाय वर्षाला तीन गॅस सिलिंडर आम्ही मोफत देऊ केले आहेत. मुलींना आपली स्वप्नं पूर्ण करता यावीत म्हणून त्यांना शिक्षण मोफत केलं आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना जास्तीतजास्त लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री मा.श्री. अमित शहा जी यांच्यासोबत चर्चा करून कांदा आणि सोयाबीनवरील निर्यात बंदी आपण उठवली. कुठल्याही परिस्थितीत माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. मी सुद्धा शेतकऱ्याच्याच घरातला आहे. दुधाला प्रतिलिटर आता ७ रुपये अनुदान आम्ही देऊ केलं आहे. शेतकरी बांधवांना वीज बिल माफी दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजना आणली आहे. वेळेनुसार कर्ज आणि बिलं भरणारे शेतकरी हे आपल्या कोल्हापूरमध्ये जास्त आहेत. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल आदींच्या मानधनात आपण चांगली वाढ केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं महायुतीचं सरकार निवडून आल्यास सर्वच योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार, असा शब्द देतो. एकच विनंती आहे की, आम्हाला पाठबळ द्या, भक्कम साथ द्या.