बारामती: संपूर्ण महाराष्ट्रात दोनच दिवसांपूर्वी पत्रकार दिन साजरा करण्यात आला, एका पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांविषयी आपल्या मनातील भावना, संवेदना कशा पद्धतीने व्यक्त केल्या हे का पोस्टच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत,
खरं तर पोलीस व पत्रकाराचे नाते किंवा लोकशाहीचा एक भाग म्हणून काय कार्य असते हे बहुतेक जणांना माहिती आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य असले तरीही त्यांच्या प्रत्येक विभागातील प्रत्येक अधिकारी व प्रत्येक कर्मचाऱ्यांची वेगळी जबाबदारी असते. ही जबाबदारी सांभाळत असताना प्रत्येक अधिकाऱ्यांचा पत्रकारांशी कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा संपर्क हा येतच असतो.
पोलीस आणि पत्रकार त्यांच्याच शब्दात…

‘पत्रकार’ आणि ‘पोलीस’ खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. तशी दोघांचीही दुःखे सारखीच. पत्रकार म्हणजे समाजप्रबोधन आणि समाजबदलाचे खरे पाईक. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून सामाजिक जीवनात काम करत असताना गुन्हेगारीला आळा घालून न्याय मिळवून देण्यासाठी ‘पत्रकारीता’ या घटकाची वेळोवेळी झालेली मदत खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांचे आभार मानने क्रमप्राप्त आहे. काम करताना पोलीस म्हणून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मग यात मानपान, मोठेपणा अशा गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून अनेक बाबींना सामोरे जावे लागते तसाच प्रकार पत्रकार बांधवांनासोबतही घडतो. बातमीत आपले नाव आले नाही? बातमीत नाव का टाकले? अशा दोन्ही सकारात्मक व नकारात्मक बाजू सांभाळताना पत्रकारांना अनेकांच्या शिव्या खावा लागतात.

अनेकवेळा केलेल्या कामाचे तोंडावर कौतुक होते, मात्र पाठीमागे शंका~कुशंका घेऊन आरोप प्रत्यारोप होतात. हे दुःख सहन करून पोलीस आणि पत्रकारांना पुढं चालवं लागतं. आपण जेंव्हा उत्तम काम करतो, तेंव्हा त्याचं समाधान वेगळंच असतं मग कुणीही काहीही म्हटलं तरी आपण अगदी आपल्या थाटात जगतो. असं उत्तम आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा पत्रकार बांधवांच्या साथीने मीही यशस्वी प्रयत्न केला. पत्रकार बांधवांना सोबत घेऊन आपल्याला असं करायचं आहे? या ठिकाणी असा बदल करायचा आहे? हे करावं लागेल, ते करावं लागेल! अशी अनेकवेळा चर्चा व्हायची, साहजिकच चांगल्या कामाला वेळ का लावायचा?तुम्ही करा आम्ही पाठीशी आहोत! पत्रकारांची ही अनमोल साथ अनेक बदल घडवणारी ठरली.

जिथे~जिथे काम केले तिथल्या सर्व पत्रकार बांधवानी माझ्या कामाला विशेष गुण दिले. अनेक बातम्या वृत्तपत्राच्या मुख्य पानावर झळकल्या, अनेक बातम्या टीव्ही चॅनेलवरही संबंध महाराष्ट्राने पाहिल्या व ऐकल्या. पोलीस ठाण्यात वर्धा, इंदापूर, बावडा, भिगवण, बारामती, कर्जत, अहिल्यानगर अशा अनेक महत्वाच्या ठिकाणी काम करत असताना मनात असलेल्या अनेक समाजहिताच्या संकल्पना कृतीतून साकार केल्या. त्या संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार बांधवांनी कसलाही कसूर केला नाही. त्यांच्याच साथीने महिला-मुली, गोरगरीब, शेतकरी, अबाल-वृद्धांना हवी ती मदत देऊ शकलो. त्यामुळेच मला अनेकांचा भाऊ, मुलगा होता आले. अनेकांचे हुंदके एका स्मितहास्यात बदलवताना पत्रकार म्हणून तुमचा सिंहाचा वाटा आहे.

ज्या-ज्या ठिकाणी काम केले तिथले सगळे पत्रकार तेवढ्या कालावधीपुरतेच मर्यादित न राहता ते आजही खास मित्र म्हणून माझ्या फ्रेंडलिस्ट आणि कॉन्टॅक्टलिस्टमध्ये आजन्म सुरक्षित आहेत. एवढेच नव्हे तर असंख्य पत्रकार मित्र कायम संपर्कात आहेत. सांगताना अभिमान वाटतो समाजहिताची कामे करताना पोलीस आणि पत्रकार हे तयार झालेलं नातं एवढं घट्ट होतं की आयुष्यात जेंव्हा-जेंव्हा बदलीसारखा कठीण प्रसंग आला तेंव्हा-तेंव्हा त्या ठिकाणाहून निरोप घेताना अनेक पत्रकार बांधवांचे पाण्याने भरलेले डोळे पाहून, आयुष्यात फक्त कामाची पोहोच पावतीच मिळाली नाही तर,आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये आणखी एक चांगला मित्र वाढला आणि हीच माझी कमाई आहे असं मी समजतो.
कितीही चांगले काम करा पण, पोलीस आणि पत्रकारांच्या वाट्याला नेहमी बदनामी येतेच. पण यातून वाट काढत आपल्या कामाला आणखी सुंदर बनवण्याची कला आपल्याला आपसूक अवगत होते. म्हणूनच तर अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळीही पत्रकार आणि पोलीस या घटकांचे सल्ले घेतात आणि अनेकांचे जीवन सुकर होते. मी आजही ज्या भागात जातो तिथे अनेक पत्रकार बांधवांना आवर्जून भेटतो. त्यांच्याशी मनभरून संवाद साधतो, खरोखरच जुन्या~नव्या गप्पा मारताना, बदल अनुभवताना मनाला खूप बरं वाटतं. आज पत्रकार दिन आहे. माझ्या सर्व पत्रकार मित्रांना खूप~खुप शुभेच्छा.
दोस्तांनो, लिहीत रहा.वंचितांना, गोरगरीबांना न्याय देत रहा आणि हो.स्वतःची, कुटुंबाची आणि सोबतच आपल्या देशाची काळजी घेत रहा.
जय हिंद!
आपलाच,

श्री.चंद्रशेखर यादव
पोलीस निरीक्षक,बारामती शहर वाहतूक विभाग
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा