गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा.

0
1
4
5
6
9
बारामतीः बारामती येथील मे.अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ व्ही. सी.बर्डे यांनी पत्नीच्या खून करून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दिनांक १९/११/२०२४ रोजी आरोपी एकनाथ पवार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात आरोपी एकनाथ पवार याची पत्नी गुलाब पवार हिची आई विमल वसंत हिलम रा.आदीवासी वाडी, ता.सुधागड जिल्हा रायगड यांनी फिर्याद दिली होती.या प्रकरणाची हकिकत अशी,
आरोपी एकनाथ पवार व आरोपी दिलीप राठोड हे झाडेझुडपे काढण्याची कामे करीत होते.जानेवारी २०१५ मध्ये ते बारामती तालुक्यातील शिरष्णे गावामध्ये झाडेझुडपे कापण्यासाठी ते आले होते व दोशी यांच्या शेताजवळ पाल करुन कुटूंबासोबत रहात होते. आरोपी एकनाथ पवार यांस दारुचे व्यसन होते. दारुसाठी पैसे न दिल्याने आरोपी त्याची पत्नी मयत गुलाब हिस मारहाण करत असे व जिवे मारण्याची धमकी देत असत.फेब्रुवारी २०१५ मध्ये एकनाथ पवार व त्याची पत्नी गुलाब यांच्यामध्ये दारु पिण्यावरुन भांडण झाले. त्यानंतर त्याने मयत गुलाब हिस प्रचंड मारहाण केली त्यात तिचा मृत्यु झाला. त्यानंतर अतिशय थंड डोक्याने आरोपी दिलीप राठोड याच्या मदतीने गुलाब हि आजारी पडली आहे तिला गावाकडे डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे असे एका खाजगी वाहनचालकाला सांगून, एकनाथ पवार व दिलीप राठोड यांनी मयत गुलाब हिस खाजगी वाहनातून कुंभारवाडी, ता. आष्टी जि. बीड येथे घेवून गेले व एका शेताजवळ थांबून मयत गुलाब हिस गाडीत उतरवून खाजगी वाहन चालकाला जाण्यास सांगितले.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी शेतात खड्डा खणून मयत गुलाब हिस तेथे जमिनीत पुरले. त्यानंतर सुमारे १ महिन्यांनी मयत गुलाबची आई विमल हिस माहिती मिळाली. त्यानंतर तिने आरोपी एकनाथ पवार विरुध्द पोलीसात तक्रार केली.
आरोपी अटक झाल्यावर त्याने मयत गुलाब हिस पुरलेली जागा तहसिलदार, पंच व तपासी अधिकारी यांच्या समक्ष दाखवली. त्याप्रमाणे मयत गुलाब हिचे प्रेत उकरुन काढले.
त्या अनुशंगाने वडगांव निंबाळकर पो.स्टे. येथे भा.द.वि. कलम ३०२, २०१ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी केला होता. दरम्यान आरोपी नं.२ दिलीप राठोड याचे कामकाज सुरु असताना निधन झाले.आरोपी नं.१ एकनाथ पवार न्यायालयीन बंदी होता.
या सर्व प्रकरणात अति. जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले. त्यांनी या प्रकरणांमध्ये ९ साक्षीदार तपासले. प्रकरणात आष्टीचे तात्कालीन तहसिलदार प्रदिप पाडुळे व वैदयकीय अधिकारी मंदार साने तसेच मयत गुलाब व दोन्ही आरोपी यांना शेवटचे सरकारी वकील प्रसन्न पहाणारे साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. जोशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी एकनाथ लक्ष्मण पवार रा. शिरष्णे,ता. बारामती जि. पुणे यास भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप तसेच पुरावा नष्ट केला म्हणून भा.द.वि. कलम २०१ प्रमाणे ७ वर्षे व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यामध्ये सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना वडगाव निंबाळकर स्टेशनचे पोलीस नाईक भागवत पाटील तसेच कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक नलवडे यांनी सहकार्य केले.