बारामती:-पेन्सिल चौक किंवा एमआयडीसी चौक हा तसा गजबजलेला चौक आहे, इथूनच अगदी हाकेच्या अंतरावर बारामती तालुका ग्रामीण पोलिस स्टेशन आहे, आणि समोरच विद्या प्रतिष्ठान हे महाविद्यालय आहे
याच चौकात काही विद्यार्थी एकमेकांना दगडाने तसेच लाथाबुक्याने मारहाण करत होते असा समाज माध्यमावर व्हिडीओ प्रसारित झाला होता, याची दखल घेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांना सोबत घेऊन विद्यानगरी च्या फाटकासमोर नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली,

उनाडक्या तसेच बेशिस्तपणे वागणाऱ्या काही मुलांना योग्य समज देण्यात आली तर काही जणांवर कारवाई करण्यात आली. काही मुलांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात आली.परंतु या गोष्टी म्हणजे केवळ मलमपट्टी असण्यासारख्याच आहेत.
विद्यार्थ्यांच्या वादाची,भांडणाची मारहाणीची कारणं काहीही असतील पण बारामतीत पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणालाही,कसलाही धाकच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे व ती चिंताजनक आहे.

पोलिस स्टेशनच्या समोरच बसस्थानक आहे. या परिसरात वाहनांची तसेच लोकांची खूप वर्दळ असते त्यातूनच काही ना काही घटना घडत असतात, जसे की एखाद्याची गाडी कोणालातरी धडकत असते पार्किंग वरून काही समस्या उद्भवत असतात तसेच या चौकात शाळा महाविद्यालयांसाठी जाणारे येणारे विद्यार्थी असतात यातूनच मुलींच्या महिलांच्या बाबतीत काही घटना घडत असतात, किंवा काही किरकोळ कारणांवरून रस्त्यावर भांडणे किंवा अगदी हाणामारीच्या घटना होत असतात.
नुकतीच बारामती शहरात एका नामांकित विद्यालयात एका विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती, ही घटना ताजी असतानाच, विद्यार्थ्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर येणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे,
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्चस्वाची किंवा गुन्हेगारीची मानसिकता वाढत आहे, यामागे काय कारणे असावीत हा अभ्यासाचा विषय असू शकतो परंतु
या सर्व घटना घडू नयेत म्हणून सर्वात पहिली जबाबदारी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाची असते,
तालुक्यात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, तसेच एक विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, बारामती तालुका ग्रामीण व बारामती शहर पोलीस स्टेशन अशी कार्यालये व अधिकारी सेवेत असताना शहरात व तालुक्यात पोलिसांबाबत दरारा नसणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

विद्यार्थी हे देशाचे भविष्य घडवणारे नागरिक असतात असं म्हटलं जातं परंतु बारामती शहरात जी काही वातावरण निर्मिती झाली आहे त्याला जबाबदार कोण?
असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

खरं तर बारामती तालुक्यात लोकसेवकांची रांग असतानाही तालुक्यात विविध घटनांमधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे ही गोष्ट खूप चिंतनीय आहे.
बारामती शहराला खरंच एका दबंग (सिंघम) अधिकाऱ्याची गरज आहे? कि जो कोणत्याही राजकीय दबावांचा विचार न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करेल व जो अशा घटनांना आळा घालेल, व पोलीस प्रशासन, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तत्पर आहे हे दाखवेल
अशा अधिकाऱ्याची बारामती शहर व तालुक्याला खरंच गरज आहे?

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा